Tuesday, November 11, 2025 11:19:52 PM

Mumbai October Heat: पावसाळा संपल्यानंतर मुंबईकरांना करावा लागतोय ‘ऑक्टोबर हीट’चा सामना; पुढील आठवड्यातही बसणार उन्हाचे चटके

शुक्रवारी शहरातील कमाल तापमान 33.7°C पर्यंत पोहोचले, जे सामान्यपेक्षा जास्त असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले.

mumbai october heat पावसाळा संपल्यानंतर मुंबईकरांना करावा लागतोय ‘ऑक्टोबर हीट’चा सामना पुढील आठवड्यातही बसणार उन्हाचे चटके

Mumbai October Heat: मान्सून परतल्यानंतर आता मुंबईकरांना 'ऑक्टोबर हीट'च्या झळा सोसाव्या लागत आहेत. शुक्रवारी शहरातील कमाल तापमान 33.7°C पर्यंत पोहोचले, जे सामान्यपेक्षा जास्त असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले. पुढील काही दिवसही ही उष्णता कायम राहण्याची शक्यता असून, 34°C पेक्षा जास्त तापमान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेतील आकडेवारीनुसार, शहरात तापमान झपाट्याने वाढत आहे. हवामानशास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, मान्सून परतल्यानंतर वाऱ्यांची दिशा बदलल्याने ही उष्णता वाढते. मान्सून दरम्यान पश्चिमेकडील दमट वारे असतात, पण ऑक्टोबरमध्ये पूर्वेकडून कोरडे वारे येतात. त्यामुळे वातावरणात आर्द्रता कमी होऊन तापमान वाढते. 

दरम्यान, 1991 ते 2020 दरम्यानच्या हवामानशास्त्रीय आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमधील सरासरी कमाल तापमान 33.6°C होते. मात्र, मागील काही वर्षांत तापमान 36°C पर्यंत पोहोचले आहे, जे ‘ऑक्टोबर हीट’ चे स्पष्ट द्योतक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, उत्तरेकडील आणि वायव्येकडील थंड वारे सुरू झाल्यानंतरच या उष्णतेतून आराम मिळू शकेल. तथापी, 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान शहरात थोड्या प्रमाणात पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

हेही वाचा - Sachin Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घालवळमुळे भावाचा पाय खोलात, सचिन घायवळवरील A to Z गुन्ह्यांची यादी समोर

वाढता प्रदूषणाचा धोका

तापमान वाढल्याने आणि पावसाचा अभाव असल्याने शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. शनिवारी सकाळी मुंबईचा AQI (Air Quality Index) 152 वर पोहोचला. जो मध्यम श्रेणीत मोडतो. यामुळे दम्याचे रुग्ण, हृदयरोगी आणि फुफ्फुसांचे आजार असलेले नागरिक विशेषतः त्रस्त होत आहेत. मुंबईतील 26 निरीक्षण केंद्रांपैकी फक्त बोरिवली पूर्व येथील स्टेशनने ‘समाधानकारक’ हवेची गुणवत्ता (AQI 80) नोंदवली. तर देवनार मध्ये सर्वाधिक प्रदूषण (AQI 209), त्यानंतर कुलाबा (AQI 200), मालाड पश्चिम (AQI 189), कांदिवली पश्चिम (AQI 176), वांद्रे पूर्व (AQI 175) आणि चेंबूर (AQI 169) या भागात नोंदवले गेले. 

हेही वाचा - BJP Meeting For Election : मध्यरात्री भाजपची बैठक, रणनीती ठरली; भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढणार?

विशेष म्हणजे, 20-21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिवाळी उत्सवादरम्यान फटाक्यांमुळे AQI पातळी आणखी खालावण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तथापी, मुंबईकरांसाठी सध्या हवामान आणि प्रदूषण दोन्ही आघाड्यांवर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस शहरात उष्णता, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता खराब  राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री