Friday, March 13, 2026 07:28:48 AM

Mumbai Local : मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक; मुंबई सेंट्रलसह 3 स्थानकांचा होणार कायापालट, 'या' आधुनिक सुविधा मिळणार

स्थानकांवर नवीन सरकते जिने (Escalators) आणि लिफ्टची संख्या वाढवण्यात येणार आहे, ज्याचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना होईल.

mumbai local  मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक मुंबई सेंट्रलसह 3 स्थानकांचा होणार कायापालट या आधुनिक सुविधा मिळणार

Mumbai Local : मुंबईतील लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि अडथळा विरहित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चरणी रोड या तीन महत्त्वाच्या स्थानकांचा आता 'मेकओव्हर' केला जाणार असून, येथे आधुनिक सोयी-सुविधांचे जाळे विणले जाणार आहे.

प्रवाशांच्या समस्यांवर रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन प्लॅन
सोमवारी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची चर्चगेट येथील मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी, अपुरे पादचारी पूल आणि फेरीवाल्यांचा विळखा यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अशा असतील नव्या सुविधा 
आधुनिक पायाभूत सुविधा:
स्थानकांवर नवीन सरकते जिने (Escalators) आणि लिफ्टची संख्या वाढवण्यात येणार आहे, ज्याचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना होईल.

प्रलंबित कामांना गती: गिरगाव आणि चरणी रोड स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फेरीवाला मुक्त परिसर: स्थानक परिसरात होणारे अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची होणारी कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासन कडक पावले उचलणार आहे.

प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण: स्थानकात येण्या-जाण्याचे मार्ग प्रशस्त करून तेथे प्रवाशांना मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा - Bhandup Railway Station : 'त्या' घटनेनंतर मोठा निर्णय! भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना प्रवेशबंदी; सीमारेषा ओलांडल्यास इतका दंड

अहवालानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
रेल्वे व्यवस्थापनाने या सर्व मागण्यांची दखल घेतली असून, संबंधित विभागाला या सुधारणांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल प्राप्त होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले आहे. या नव्या बदलांमुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास केवळ वेगवानच नाही, तर अधिक आरामदायी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री