Wednesday, January 15, 2025 06:20:40 PM

'Mahalakshmi Saras-2024'
नवी मुंबईत होणार अनोखं प्रदर्शन माहिती आहे का?

नवी मुंबईत 'महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2024' चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत होणार अनोखं प्रदर्शन माहिती आहे का

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी 14 ते 25 डिसेंबर 2024  या कालावधीत राज्यस्तरीय 'महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2024' चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून व्यवसायवृध्दी व्हावी असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

महालक्ष्मी सरसचे  नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी सरसला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्याप्रमाणे या वर्षी सुध्दा महालक्ष्मी सरसवाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी भरविण्यात येत असल्याने नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनएक अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृती शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये साधारण 475 स्टॉल आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 375 आणि देशभरातून साधारण 100 स्टॉल लावण्यात येणार आहेत.  प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे 75 स्टॉलचे मिळून भव्य असे फूड कोर्ट असणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसर, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू असणार आहेत. याशिवाय महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारचे दागिणे, लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी ( प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.

या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला हातभार लागावा. यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन शुद्ध खात्रीच्या वस्तू आणि पदार्थांची खरेदी करावी. नवी मुंबई आणि जवळच्या परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा भरभरुन लाभ घ्यावा असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


सम्बन्धित सामग्री