Maharashtra Political News : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत खळबळजनक दावे केले आहेत. राऊत म्हणाले की, "पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोग 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवेल, याची मला खात्री आहे." राऊत यांनी भाजपला इशारा देताना म्हटले की, "जर माझ्या हातात देशातल्या विशिष्ट खात्यांची सत्ता आली, तर मी भारतीय जनता पक्षाचे देशभरात 15 तुकडे करून दाखवेन. सध्या हे सर्व केवळ ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर चालले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृतीचे अस्तित्व सत्ता आल्यावर राहणार नाही, त्यांना अखेर भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल."
कल्याण-डोंबिवलीतील 'बेईमानी'वर संताप
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पक्षांतराचा मुद्दा उपस्थित केला. "मशाल या चिन्हावर निवडून आल्यावर अवघ्या 24 तासांत तुम्हाला वेगळे कोंब फुटतात, ही पूर्णपणे बेईमानी आहे," असे ते म्हणाले. आमचे जे नगरसेवक हरवले आहेत, त्यांची तक्रार आम्ही आधीच केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वसंत मोरे आणि प्रशांत जगताप यांच्यातील वाकयुद्ध
पुणे महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर वसंत मोरे यांनी काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना जगताप म्हणाले, "वसंत मोरे हे स्वतःला आंतरराष्ट्रीय नेते समजतात, ज्यांचे 5 ते 6 लाख फॉलोअर्स आहेत, पण त्यांना मते मात्र केवळ 20,000 पडली आणि त्यांच्या मुलाचे डिपॉझिट जप्त झाले. एवढ्या मोठ्या नेत्याने माझ्यासारख्या छोट्या माणसावर टिप्पणी करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे. त्यांच्या प्रभागातील भाजपच्या एका नवख्या कार्यकर्त्याने त्यांचा पराभव केला आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे."
हेही वाचा - Eknath Khadse : "होय, नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली" एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान
पुणे महापौर पदाची निवडणूक:6 फेब्रुवारीचा मुहूर्त
पुण्याच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "नगरसचिवांनी महापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. आगामी 2 दिवसांत आमचा गटनेता निवडला जाईल. त्यानंतर 30 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले जातील आणि त्याच दिवशी अधिकृत अर्ज दाखल केले जातील." या प्रक्रियेमुळे पुण्याच्या नव्या महापौराबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
एआयएमआयएमच्या सहर शेख यांचे वादग्रस्त विधान
मुंब्र्यातील एआयएमआयएमच्या नवनियुक्त नगरसेविका सहर शेख त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. "हिंदुस्थान कोणाच्या बापाचा नाही, आम्ही भारतीय मुस्लिम आहोत," असे विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केले. यापूर्वी त्यांच्या मुंब्र्यातील सभेतील 'कैसा हराया' हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता या नवीन विधानामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : "इम्तियाज जलील साप, त्यांना ठेचायला हवे" इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर शिरसाटांची संतप्त प्रतिक्रिया