मुंबई: MPSC परीक्षेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लोकसेवा आयोगाच्या विविध तांत्रिक आणि धोरणात्मक अडचणींबाबत आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी झाली.
ही भेट पुण्यातील मोदी बाग कार्यालयात पार पडली असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत शरद पवार यांनी आज 15 एप्रिल रोजी थेट MPSCचे अध्यक्ष रजनीश सेठ यांच्याशी फोनवर संवाद साधला.
या संवादात पवारांनी EWS आणि SEBC आरक्षणातील तांत्रिक अडचणी, राज्यसेवा मुख्य परीक्षेतील विसंगती आणि संयुक्त पूर्व परीक्षेतील जागा वाढ यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने तोडगा काढण्याची सूचना केली आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, फक्त 200 जागांसाठी PSI ची जाहिरात निघाल्यामुळे नाराजी आहे, कारण वास्तविकता 3000 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यासंदर्भातही शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, लवकरच फोनवरही चर्चा होणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे.