ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री कोण असेल ? याची चर्चा सुरू होती अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. एकूण काय तर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठीच्या स्पर्धेतून माघार घेतली. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांनी वडिलांप्रति असलेली भावना मांडली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा अभिमान वाटत असल्याचे या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना देखील स्वत:ला सामान्य माणसाप्रमाणे समजले. अहोरात्र मेहनत केली. प्रगतीच्या शिखरावर असतानाही त्यांच्यातील नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
श्रीकांत शिंदे यांनी केलेली भावनिक पोस्ट
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.
खूप अभिमान वाटतो बाबा!
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नम्र राहिले. कदाचित त्यांच्यातील हाच गुण सर्वसामान्यांना भावला असेल. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पोस्टमधून एकनाथ शिंदेंमधील प्रेमळ, द्याळू स्वभावाचे दर्शन घडून आले. खासदार शिंदेंनी पोस्टच्या माध्यमातून बापासाठी वाटत असणाऱ्या भावना शेअर केल्या आहेत. या पोस्टमधून श्रीकांत शिंदे भावनिक झाल्याचे दिसून येते.