मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागामधील तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाने कारवाईच्या नोटीस बजावल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या साधं ऐकून घ्यायला. त्यांना योग्य मार्गदर्शन करायला प्रशासनाची उदासीनता काही नवी नाही. परंतु अनेकवेळा हेलपाटे घालून देखील विद्यार्थ्यांची कामे होत नाहीत. किमान 8 दिवसात देण्यात यायला हवी अशी कागदपत्रे मिळवण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागेल असे विद्यार्थ्यांना सांगण्यात येते. यावेळी आपली कागदपत्रे किती दिवसात मिळतील विचारणाऱ्या दोन विद्यार्थिनींसोबत असभ्य वर्तन करत त्यांना अर्वाच्य भाषेत उत्तरे देत त्यांची कागदपत्रे हिंमत चौधरी या अधिकाऱ्यांकडून फेकण्यात आली. या अधिकाऱ्याविरोधात साधी तक्रार ऐकून घ्यायला परीक्षा नियंत्रक तयार नव्हत्या.
एक तासाच्या आंदोलनानंतर भेटलेल्या परीक्षा नियंत्रकांनी मात्र केवळ कारवाईचे तोंडी आश्वासन दिले. मात्र सलग दोन दिवस विद्यापीठाच्या अनियमित कारभारावर आवाज उठवल्याचा राग ठेवून विद्यापीठ प्रशासनाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांना नोटीस देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवली. विद्यापीठ प्रशासनाने आपल्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांना वाचवायचा घाट घातला आहे हे सिद्ध होते. सिनेट निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या संविधान विरोधी परिपत्रकाचा आधार घेत कारवाई करण्याचा इशारा देत विद्यापीठाने आपण सकारात्मक टीकेला घाबरतो आणि आपली अनागोंदी व्यवस्था कायम ठेवू इच्छितो हे स्पष्ट केले आहे .
काय म्हणाले अभाविपचे मुंबई महानगर मंत्री?
मुंबई विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा का प्रयत्न करत आहे? विद्यार्थ्यांनी त्यांना सोसाव्या लागणाऱ्या गैरसोयी आणि अत्याचाराविरोधात बोलायचं नाही का ? आंदोलन, निषेध करायचे नाहीत म्हणजे विद्यापीठाला लोकशाही मूल्ये मान्य नाहीत का ? आंदोलन कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरवणारे कुलगुरू स्वतःला न्यायाधीश बनवू पाहत आहेत का ? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत अशी प्रतिक्रिया मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नेमकं प्रकरण काय ?
सोमवारी 9 डिसेंबर रोजी वसतिगृहातील अनियमिततेविरोधात अभाविपने छापामारो आंदोलन केले होते. वसतिगृहात विद्यार्थी अनधिकृतपणे एलईडी टीव्ही, सोफा सेट आणि एअर कंडिशनसह सापडले. याशिवाय गेल्या पाच महिन्यांपासून अंध विद्यार्थ्यांसाठी उकरून ठेवलेला खड्डा आणि परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच सापडला. मंगळवारी छापामारो आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू असताना परीक्षा विभागात चौकशीसाठी साधी खिडकीसुद्धा उपलब्ध नसल्याचे उघड झाले. विद्यापीठ प्रशासनाच्या समन्वयाअभावी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. या दरम्यान अधिकाऱ्यांचे असभ्य वर्तन समोर आले. ज्यावर अभाविप कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली. कुलगुरूंनी चर्चा नाकारल्यामुळे अभाविपने फोर्ट कॅम्पसच्या गेटवर निवेदन चिकटवले.