BMC Budget 2026: महायुती सरकारच्या सत्ताकाळात मुंबई महानगरपालिकेचे पहिलेच अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सुपूर्द केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तरतुदीमध्ये 6,525 कोटींची (साधारण 9 टक्के) वाढ करण्यात आली आहे. मात्र, विकासकामांच्या घोषणांसोबतच मुंबईकरांवर नवीन करांचा बोजा टाकण्यात आला आहे.
1. मुंबईकरांच्या खिशाला झळ: कर आणि पाणीपट्टी
महायुतीने निवडणुकांपूर्वी 'पाणीपट्टी न वाढवण्याचे' आश्वासन दिले होते, मात्र अर्थसंकल्पातून वेगळेच चित्र समोर आले आहे:
लहान घरांवर कर: यापूर्वी 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि मलनि:सारण करातून सरसकट सूट होती. आता ज्या घरांना 'वॉटर मीटर' (जलमापक) नाही, त्यांना पाणीपट्टी आणि मलनि:सारण कर भरावा लागणार आहे.
करमणूक कर: 30 सप्टेंबर 2026 नंतर मुंबईकरांना चित्रपट किंवा इतर मनोरंजनासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, कारण महापालिका पुन्हा 'करमणूक कर' वसूल करणार आहे.
2. पायाभूत सुविधा आणि 'ग्रीन' प्रकल्पांसाठी निधी
पालिकेने मोठे प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला आहे:
ग्रीन बॉन्ड्स: पहिल्यांदाच पालिका 1,000 कोटींचे 'ग्रीन बॉन्ड्स' बाजारात आणणार आहे, ज्यावर केंद्र सरकारकडून 100 कोटींचे अनुदान मिळेल.
बोगद्यांचे जाळे (Multi-model Tunnels): वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 6 किमी लांबीचा भूमिगत बोगदा प्रकल्प प्रस्तावित आहे. एका स्तरावर वाहतूक आणि दुसऱ्या स्तरावर नाले अशी रचना असलेल्या या प्रकल्पाचा खर्च 4,392 कोटी (प्रति किमी 732 कोटी) अपेक्षित आहे.
पुलांची कामे: मुंबईत एकूण 101 पुलांची कामे सुरू आहेत. पूल विभागासाठी 9,650 कोटींची मोठी तरतूद असून, सर्व कामे पूर्ण होण्यास 2028-29 साल उजाडणार आहे.
3. मिठी नदी आणि पावसाळा पूर्व तयारी
पावसाळ्यात मुंबई तुंबू नये यासाठी विशेष तरतूद:
- मिठी नदीच्या विकास आणि प्रदूषण नियंत्रणासाठी 286.25 कोटी राखून ठेवले आहेत.
- पर्जन्य जल वाहिन्यांच्या कामांसाठी 1,800 कोटी प्रस्तावित आहेत.
4. आरोग्य आणि फेरीवाला धोरण
आरोग्य: आरोग्य खात्यासाठी 5,237 कोटी प्रस्तावित आहेत. 'आपला दवाखाना' उपक्रमांतर्गत आता मधुमेह आणि नेत्रविकारांवर 'AI' (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे मोफत उपचार केले जातील.
डिजिटल जनगणना: 2027 ची जनगणना पूर्णतः डिजिटल असेल, ज्याचा पहिला टप्पा एप्रिल 2026 पासून सुरू होईल.
फेरीवाले: अधिकृत फेरीवाल्यांना आता QR कोड आधारित प्रमाणपत्र दिले जाईल, जेणेकरून अनधिकृत फेरीवाल्यांची ओळख पटवणे सोपे होईल.
5. पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन
वाढत्या प्रदूषणाशी लढण्यासाठी पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी 159.82 कोटी खर्च केले जातील. तथापी, देवनार येथील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून 2026 पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
6. आता 'AI' करणार मुंबईकरांना मार्गदर्शन
माहिती तंत्रज्ञान विभागासाठी 44.88 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर केला जाणार आहे.
BMC Citizen AI Coach: पालिकेच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेताना नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी 'डिजिटल वॉकथ्रू'द्वारे हा एआय कोच मार्गदर्शन करेल.
BMC Employee AI Coach: कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र एआय प्रणाली विकसित केली जाईल.
7. पाणीपुरवठा: मुंबईची तहान भागवण्यासाठी 6,475 कोटींचा प्लॅन
वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेता पाणीपुरवठा प्रकल्पांच्या निधीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
मनोरी प्रकल्प (Desalination Plant): समुद्राचे खारे पाणी गोड करणाऱ्या मनोरी प्रकल्पासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यामुळे दररोज 200 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे.
बोगद्यांचे जाळे: येवई ते कशेळी (790 कोटी) आणि कशेळी ते मुलुंड (640 कोटी) दरम्यान जल बोगद्यांची बांधणी प्रस्तावित आहे.
भांडुप संकुल: नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
8. पर्यटन आणि राणीबाग: आफ्रिकन सफारीचा अनुभव
मुंबईची पर्यटन ओळख जपण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) साठी 136.70 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नवे आकर्षण: राणीबागेत आता टनेल मत्स्यालय (Tunnel Aquarium) आणि 'एक्झॉटिक झू' तयार केले जाईल.
चित्ता उपहारगृह: आफ्रिकन थीमवर आधारित दोन मजली 'चित्ता कॅफे' पर्यटकांच्या सेवेत येणार आहे.
पक्षी रुग्णालय: दुर्मिळ पक्ष्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय व विशेष स्वयंपाकघर उभारले जाईल.
हेही वाचा - BMC Budget 2026: मुंबईकरांच्या विकासासाठी BMC च्या तिजोरीचे कुलूप उघडले; महापालिकेच्या 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार
9. काळा घोडा आणि ग्रीन फिल्मींग
दरम्यान, ऐतिहासिक काळा घोडा परिसराचा कायापालट केला जाणार आहे. विशिष्ट वेळेत हा परिसर केवळ पादचाऱ्यांसाठी खुला असेल. येथील सर्व दुकानांचे फलक 'एकसमान' ठेवण्याचे धोरण राबवले जाईल. तथापी, मुंबईला जागतिक पातळीवर 'ग्रीन फिल्मींग डेस्टिनेशन' म्हणून विकसित करण्यासाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या तरतुदी
अग्निशमन दल: सुरक्षेसाठी 230 कोटींची तरतूद.
पर्जन्य जलवाहिन्या: पूर नियंत्रणासाठी 1800 कोटींचा निधी.
हायमास्ट दिवे: मुंबई उजळवण्यासाठी 323 कोटींची तरतूद.