मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज 'निर्धार मेळावा' संपन्न झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर 'ॲनाकोंडा' म्हणत जोरदार हल्ला चढवला, तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे करत गंभीर इशारा दिला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी भर पावसात झालेल्या दसरा मेळाव्याची आठवण करून दिली.
'ॲनाकोंडा' आणि व्यापाऱ्यांकडून मुंबईवर डोळा
मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुंबईवर 'दोन व्यापाऱ्यांचा डोळा' असल्याचे विधान केले. थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "सामना वृत्तपत्रात दोन बातम्या पाहिल्या—एक भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाची आणि दुसरी राणीच्या बागेत 'ॲनाकोंडा' आणला जाणार असल्याची. आज तसाच एक 'ॲनाकोंडा' येऊन गेला." असे म्हणत त्यांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची खिल्ली उडवली. "भूमिपूजन करायला आलाय ना, करा ना? नारळ डोक्यावर फोड किंवा दगडावर फोड. तुमची ब्रह्मचाऱ्याची पिलावळ नाही. गाढवंही गेले, ब्रम्हचारी गेले याचा अर्थ मी सांगत नाही तुम्ही जाऊन शोधा," अशा खोचक शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
हेही वाचा - New Maharashtra BJP Office: अमित शहांकडून मुंबईत महाराष्ट्र भाजप कार्यालयाची पायाभरणी; म्हणाले, 'राज्यात भाजपला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही...'
शिवसैनिकांना मतदार यादी तपासण्याचा 'मंत्र'
यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या यादीतील घोळ पुराव्यासह दाखवून देत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. यावर उद्धव ठाकरेंनीही गंभीर विधान केले. ते म्हणाले, "लोकशाहीत मतदार सरकार निवडतात, पण आताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडतात." एका यादीत 1200 नावे आहेत, पण घरे फक्त 300 आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांना मतदार यादी वाचण्याचा आणि ती तपासण्याचा 'मंत्र' दिला. "तुम्ही उपशाखाप्रमुख जाऊन यादीचे वाचन करायचे आहे. जर तुम्हाला बोगस आहे असं वाटलं, तर त्याला समोर थोबडवा," असे आक्रमक आवाहन त्यांनी केले.
निवडणूक आयोगाला थेट इशारा आणि भाजपवर टीका
उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यातून थेट निवडणूक आयोगाला मोठा इशारा दिला. ते म्हणाले, "निवडणूक आयोगाला सांगतोय, ह्या गोष्टी सुधरवा, नाहीतर निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू." त्यांनी भाजपला 'भुरटे चोर' म्हणत टीका केली आणि "मोदींना आता मुंबई गिळायची आहे, हे काही नवीन नाही," असे म्हटले. "दोन व्यापाऱ्याना वाटत असेल सांडलेल्या रक्ताची किंमत मुंबई विसरली असेल, तर त्यांचं थडगं बांधायची तयारी ठेवायची," असा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्याना दिला. भाजपवर टीका करताना त्यांनी भाजपला 'बोगस टोळी' संबोधले. "नामर्दाची औलाद आहात," अशा कठोर शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांनी एका चहावाल्याला आम्ही पाठिंबा दिला, म्हणून ते पंतप्रधान झाले, असेही म्हटले. तसेच, आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, पण त्यांना आत्मनिर्भर भाजप बनवता येत नाही, भाड्याने घ्यावे लागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
या मेळाव्यात त्यांनी शिवसेना, मिंधे (शिंदे गट) आणि भाजप यांच्याकडे जीवाला जीव देणारी माणसं नाहीत अशी टीका केली आणि पावसामुळे त्यादिवशी ते (भाजप/मिंधे गट) फटक्यातून वाचले, असे म्हटले. त्यांनी विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांना भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांना लवकरच भेटणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - Mira Bhayandar Marathi Language Insult: भाईंदर मध्ये छटपूजेच्या मीटिंग दरम्यान मराठी भाषेचा अपमान; मराठमोळे आयपीएस अधिकारी चव्हाण यांनी हिंदीतच बोलण्याचा धरला अट्टाहास