Mumbai Water Metro: रस्त्यांवरील खड्डे आणि लोकलची गर्दी यातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारने आता 'जलमार्गा'चा पर्याय निवडला आहे. कोचीच्या धर्तीवर मुंबईत 'वॉटर मेट्रो' (Water Metro) सुरू करण्याची घोषणा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून ही सेवा टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
प्रकल्पाचा 'मास्टर प्लॅन' काय आहे?
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) जल वाहतुकीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) 28 फेब्रुवारीपर्यंत सादर केला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत या प्रकल्पावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. विशेष म्हणजे, या मेट्रो पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक बोटी असतील. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 1200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांना विद्युत बोटींनी जोडण्याचे उद्दिष्ट असून एकूण 8 मार्ग प्रस्तावित आहेत.
हेही वाचा - Holi Special Train Service : होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वेच्या 34 विशेष गाड्यांना मुदतवाढ; आरक्षण सुरू
कोणत्या मार्गांना मिळणार प्राधान्य?
पहिल्या टप्प्यात दोन मुख्य मार्गांवर जल मेट्रो धावणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नरिमन पॉईंट-वांद्रे-जुहू-वर्सोवा या मार्गाचा समावेश असेल. दक्षिण मुंबईतील रेडिओ क्लब जेटीचे कामही वेगाने सुरू असून, यामुळे नरिमन पॉईंट ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर केवळ 40 मिनिटांत पार करता येणार आहे. 'मुंबईत आधी जल मेट्रो सुरू करून नंतर तिचा विस्तार शेजारील जिल्ह्यांमध्ये केला जाईल. डिसेंबरपर्यंत पहिले दोन मार्ग कार्यान्वित करण्याचे आमचे लक्ष्य आहे,' असं बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका
मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी ही जल मेट्रो मैलाचा दगड ठरेल. वॉटर टॅक्सी प्रकल्पाचाच हा एक प्रगत भाग असून, यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.