२ सप्टेंबर, २०२४, मुंबई : लहानमोठ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे यंदा शनिवारी ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरु होतो. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाची गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ आणि समाप्ती जाणून घेऊया.
चतुर्थी तिथी प्रारंभ आणि समाप्ती-
पंचांगानुसार, यंदा गणेश चतुर्थी तिथी ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ०१ मिनिटे ते ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील.
गणेश विसर्जन २०२४ कधी आहे-
गणेशोत्सव १० दिवस साजरा केला जातो. भाविक गणपती बाप्पाला आपल्या घरी परंपरेनुसार दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवसही गणपती बसवतात. मात्र, १० दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. यावर्षी अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवारी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक बाप्पाला निरोप देतात. तलाव किंवा नदीत गणपतीची मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे.