मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन 2025-26 वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बोरिवलीच्या शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न 30 हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर(पू) मुंबई-71 या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
हेही वाचा: शिवभोजन थाळीचे अनुदान थकल्याने विदर्भातील केंद्र चालकांनी दिला आंदोलनाचा इशारा
मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, भोजन, रुपये 900-मासिक निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम, ग्रंथालय सुविधा, दैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. प्रवेशासाठी विहित पात्रता आवश्यक आहे. या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून, वसतिगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर आपला अर्ज करावा.