गुरुवारपासून मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली असून राज्यात मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकलसेवासुद्धा बंद करण्यात आली होती. आणि आता सद्यस्थिती पाहता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यातच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
येत्या २८ ऑक्टोबरपासून लोकल रेल्वेच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावर १०० टक्के लोकल फेऱ्या धावणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दिवसांत मध्य रेल्वेवर १,७७४ आणि पश्चिम रेल्वेवर १,३६७ रेल्वेसेवा सुरू होणार आहेत. अत्यावश्यक सेवा आणि लसीचे दोन घेतलेल्यांना तसेच १८ वर्षांखालील सर्व विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.