Tue. Jun 28th, 2022

राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. राणा दाम्पत्याला पालिकेने मुंबईच्या घराला अनधिकृत बांधकांमाची नोटीस बजावली होती. या नोटीसीची मुदत आता संपली आहे. कारण राणा दाम्पत्याने खार येथील घराच्या अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला दिलेलं उत्तर महापालिकेने अमान्य केलं आहे. तसंच पुढील सात ते पंधरा दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा आम्हाला याबाबत कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आल्याची माहिती आहे. राणा यांच्या घरात अनधिकृत बांधकाम असल्याच्या मुद्द्यावर पालिका ठाम आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांचे मुंबईतील खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटीस पाठवल्या आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या पथकाने याबाबत तपासणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उत्तरही दिलं. मात्र हे उत्तर असमाधानकारक असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राणा दाम्पत्याच्या खार येथील घरावर पालिकेचा हातोडा चालण्याची शक्यता आहे.दरम्यान राणा दाम्पत्य पालिकेच्या या प्रकरणी कोर्टात जाऊ शकेल किंवा पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे नियमीततेचा अर्ज दाखल करु शकेल का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.