Fri. Sep 24th, 2021

नागपुरमध्ये दुहेरी हत्याकांड; मामा-भाचीचं संपवलं जीवन

राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान नागपुरमध्ये घरात दोन मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरमधील दत्तात्रय नगरमध्ये हि घटना घडली आहे.

परिसरातील तीन दिवस बंद असलेल्या घरात मामा भाचीचा मृतदेह आढळून आला आहे. मंजुषा जयंतराव नाटेकर आणि अशोक काटे अशी मृतांची नावे आहेत. या हत्याकांडा मागे मृतक मंजुषा नाटेकर यांचे पती जयंत नाटेकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर सर्वाधिक संशय आहे. मंजुषा नाटेकर ह्या त्यांच्या पती सोबत दत्तात्रय नगरातील देशमुख अपार्टमेंट मध्ये राहत होत्या. त्या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहेत. तर त्यांचे पती जयंत हे ड्राईव्हर आहेत.

मंजुषा यांचे मामा अशोक काटे नागपुरातीलच जवाहर नगर येथे राहत होते. पण काही दिवसांसाठी ते मंजुषा यांच्याकडे राहायला आले होते.

नाटेकर दाम्पत्याला एक मुलगा असून तो पुण्याला राहतो. मंजुषा नाटेकर या शनिवारी शाळेत गेल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या. त्यानंतर सोमवारी शेवटच्या शेजारच्यांना दिसल्या. मात्र त्यानंतर त्या दिसल्या नाही.

शनिवार ते सोमवार या दोन दिवसांच्या दरम्यान नाटेकर दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणांवरून अनेक वेळा कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातूनच जयंत नाटेकर यांनी पत्नी मंजुषा आणि त्यांचे मामा अशोक काटे यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मंजुषा या मुख्याध्यापिका असल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या शाळेतील इतर शिक्षक त्यांना संपर्क करत होते. मात्र त्या फोनच घेत नसल्याने ललित रारोकर नावाच्या शिक्षकाने मंजुषा यांचे भाऊ राजीव खनगर यांच्याशी संपर्क केला.

त्यानंतर ते मंजुषा यांच्या घरी आले. तेव्हा घर बाहेरून बंद होते. मात्र आतून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा समोरच्या खोलीत मामा आणि आतील खोलीत मंजुषा या मृतावस्थेत पडलेल्या होत्या.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *