Jaimaharashtra news

अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम, अधिकृत कागदपत्रांसाठी हिंदू? – नवाब मलिक

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप सादर केले आहेत. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील ते सादर करत आहेत. याबाबत, आज नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडे यांच्या आईंशी संबंधित कागदपत्र ट्विटरवर शेअर केले आहे.

नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्या आईंच्या मृत्यू दाखल्याचे फोटो शेअर करत आणखी एक फर्जीवाडा असे म्हटले आहे. मलिकांनी समीर वानखेडे यांच्या आईचा मृत्यू दाखला सादर करत अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी अधिकृत कागदपत्रांसाठी हिंदू? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांची आई झहीदा वानखेडे यांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र सादर केले. या प्रमाणपत्रावर त्यांच्या आईचे नाव झहीदा ज्ञानदेव वानखेडे असे असल्याचे स्पष्ट होत आहे.

यापूर्वी मलिकांनी समाजमाध्यमांवर सादर केलेल्या कागदपत्रांविषयी न्यायालयाने मलिकांना चांगलेच फटकारले आहे. नवाब मलिकांना अधिक जबाबदारीने वागण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्वीट करण्यापूर्वी पूर्णपणे तपासला असल्याचे मलिकांनी न्यायालयाला सांगितले  होते. मात्र सर्वसामान्य व्यक्तीला कदाचित तितक्या काळजीपूर्वक तपासता येणार नाही, परंतु आमदार मंत्रीने कागदपत्र अधिक काळजी घेऊन तपासणे अपेक्षित आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाकडून मलिकांना फटकारले आहे.

Exit mobile version