Sat. Jun 6th, 2020

‘माझी कंट्रोल रूम सुरू, चोराला पकडणार’, प्रदीप शर्मा यांच्या इशाऱ्याने खळबळ

‘शिवसेनेचा भगवा पालघरवर जसा डौलाने फडकतो आहे, त्याच डौलाने आता आपल्याला तो नालासोपाऱ्यावर फडकवायचा आहे. इथल्या झुंजीची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मला खात्री आहे ही कामगिरी तुम्ही फत्ते करालच. तुमचा विजय आजच घोषित करायला हरकत नाही’, अशा शब्दांत शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी प्रदीप शर्मा यांना शुभेच्छा दिल्या. नालासोपाऱ्यातील लढतीत लोकांच्या बाजूने उतरलेल्या शर्मा यांच्या शिवनेरी 132 या नियंत्रण कार्यालय आणि वॉर रूमचे उद्घाटन फाटक यांच्या हस्ते आज करण्यात आले.

“मी केवळ निवडणुकीपुरता येथे आलेलो नाही. आता येथेच असेन आणि लोकांमध्ये राहीन. माझी कंट्रोल रूम सदैव जनतेसाठी खुली असेल. नवीन, सुंदर विरार नालासोपारा मी तुम्हाला देणार हा माझा शब्द आहे. इथल्या पक्षाने, नेत्यांनी इतकी वर्षे तुम्हाला फसवलं, लाथाडलं, रडवलं!! आताही विकासाच्या भुलथापा सुरू झाल्या आहेत. भूमीपूजनांचा धडाका लावलाय, कामांचा पत्ता नाही. यांच्यावर विसंबाल तर पुढच्या वर्षीही घरदारं पाण्यातच जातील. बदल घडवा, मला संधी द्या”, असं आवाहन प्रदीप शर्मा यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातील सहाही आमदार निवडून आणू, विकास घडवू, असंही ते म्हणाले.

हा नियंत्रण कक्ष आणि वॉर रूम येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडींचे एक केंद्र बनणार आहे. विजयाची तुतारी इथूनच फुंकली जाईल, अशी भावना शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष वसंत चव्हाण व इतरांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *