Jaimaharashtra news

नागपुरात तोतया डॉक्टर अटकेत

नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेडिकल रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचा कधी निवासी तर कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर म्हणून वावरत अनेकांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ जैन असे या तोतया डॉक्टरचे नाव असून तो मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचालींवर अनेक डॉक्टरांना संशय येत होता. शुक्रवारी हा तोतया डॉक्टर मेडिकलच्या मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर असल्याचे सांगत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आला होता. याबाबत माहिती मिळताच कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसरने या तोतयाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

हा आरोपी सिद्धार्थ जैन या नावाची प्लेट ॲप्रनवर लावून, गळ्यात स्टेथेस्कोप अडकवून तो गरीब आणि गरजू रुग्णांसोबत संपर्क साधायचा. रुग्णांना चांगल्या उपचाराची हमी देत त्यांच्याकडून पाच ते दहा हजार रुपये घ्यायचा. मात्र, नंतर तो गायब होत असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान या तोतयाने बीएससी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले होते पण काही कारणास्तव डॉक्टर होता आलं नाही,त्यामुळे ॲप्रन घालून आपली हौस भागवण्यासाठी मेडिकलमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. असे करत असताना अनेकांना उपचाराच्या नावावर लुटले असल्याचे देखील उघड झाले आहे.

Exit mobile version