Jaimaharashtra news

लग्न समारंभात कोरोना नियमांची पायमल्ली

नागपूर: कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहे. नागपूरात या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत ५० हजारांचा दंड वसूल केला.दरम्यान धंतोली झोन,हनुमान नगर आणि नेहरू नगर झोन अशा दोन ठिकाणी प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई धंतोली झोन अंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर करण्यात आली. येथे लग्नसमारंभात १०० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेले नव्हते. सहाय्यक आयुक्त किरण बगडे यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथकाने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाला आणि लॉन मालकाला प्रत्येकी १० हजार रुपये असा २० हजारांचा दंड ठोठावला. याच झोननंतर्गत दुसरी कारवाई चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभावर करण्यात आली. त्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तिसरी कारवाई हनुमान नगर झोन अंतर्गत असलेल्या मारकंडे सभागृहात करण्यात आली. अभिजित पराते यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर नेहरू नगर झोन अंतर्गत करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहात उपद्रव शोध पथकाकडून एकनाथ चामट यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Exit mobile version