Fri. Sep 17th, 2021

टँकरबंदीचा निर्णय विश्वासात न घेता घेतला, नगरसेवकांचा आरोप

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहरातील पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वर्षाला महापालिकेच्या 11 ते 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

पण महापालिकेची पाणीपुरवठा समिती आणि स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आलाय, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

नागपुरात सध्याच्या घडीला 346 टँकरने पाणी पुरवठा केला जातो.

शहरातील विविध आणि खासकरून नव्या वस्त्यांमध्ये जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे त्या वस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

या टँकर्सवर दरवर्षी महापालिकेचे 28 कोटी रुपये खर्च होतात. आता 120 टँकर बंद करण्यात आल्याने दरवर्षी 11 ते 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात शासकीय निधी, अमृत योजना, विशेष निधीच्या माध्यमातून जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे.

अलीकडच्या काळात महापालिकेच्या 8 झोन अंतर्गत 17 हजार नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ज्या भागातील टँकर्सची मागणी कमी झाली आहे. त्या भागातील टँकर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

टँकर बंद करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या पैशांची बचत होणार आहे. तरीही पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप पाणीपुरवठा समिती सभापतींनी केला आहे.

सोबतच येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या उद्भवल्यास नागरिकांची पाण्याची समस्या कशी दूर करणार असा सवाल स्थानिक नगरसेवक करीत आहेत.

मागील वर्षी शहर सीमेत जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर,नरसाळा भागात शासकीय निधी अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या.

या भागात सुमारे 8 हजार नळ जोडणी देण्यात आल्या.

हुडकेश्वर – नरसाळा भागात 76 टँकर्स द्वारा 530 फेऱ्या करण्यात येत होत्या. या भागातील 90 टक्के जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने या भागातील टँकर्स बंद करण्यात आले आहे.

येत्या काळात आणखी 100 टँकर्स कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे यापूर्वही महापालिका आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकर वर होणारा खर्च आटोक्यात आणण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत.

परंतु या टँकर कमी करण्याच्या तडकाफडकी निर्णय मुळे महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *