Wed. Dec 8th, 2021

बाळासाहेब असते, तर उद्धव मुख्यमंत्री झालेच नसते – नारायण राणे

‘आज बाळासाहेब असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते’ असं विधान नारायण राणे यांनी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. आपल्या पत्रकार परिषदेत राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. नीतीमत्ता झिडकारून मुख्यमंत्री झालेल्यांकडून विकास आणि चांगल्या कामांची अपेक्षा करता येणार नाही, असं ते म्हणाले.

काय म्हणाले राणे?

अधिवेशनाच्य़ा 5 दिवसांत एकही महत्त्वाचा निर्णय झाला नाही. अधिवेशनात प्रथा, परंपरा, नियम पायदळी तुडवण्यात आले.

एक महिना होऊनही अद्याप मंत्र्यांची नियुक्ती झाली नाही. खातेवाटप अजूनही झालेलं नाही.

महिना झाला, तरी कर्जमाफी झालेली नाही. सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय अद्याप सरकारने (CM) घेतला नसल्याचंही राणे म्हणाले.

या आघाडीला कोणतीही विचारसरणी नाही, असं म्हणत महाराष्ट्र अधोगतीला गेल्यास त्याला हे सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा राणेंनी दिला.

महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या क्षमतेवर त्यांनी शंका उपस्थित केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार म्हणताना हिंदुत्वाचा मुद्दा सोडण्याचाही शब्द त्यांनी बाळासाहेबांना दिला होता का असाही सवाल राणेंनी केला.     

उद्धव ठाकरेंसंदर्भात राणेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी मुख्यमंत्री झाले असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवार यांनी खासगीत भेटून विनंती केल्याचा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. सर्वांसमोर बोलताना शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, असं जाहीर करणारे उद्धव ठाकरे संजय राऊत (Sanjay Raut) यांना शरद पवारांकडे (Sharad Pawar) पाठवून आपल्या नावाची घोषणा करावी, यासाठी विनंती करत होते, असा आरोप राणे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *