Sat. Nov 27th, 2021

‘फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?’

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीची घोषणा केली. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून ही टाळेबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाने टाळेबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. भाजपा नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

‘राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. ५९ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे राज्य सरकारचं पाप आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पाप आहे. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे आणि मृतांचे आकडे जाहीर करतात. हे नाही-ते नाही सांगतात. जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना?’, अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

टाळेबंदीसंदर्भात बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकंच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?’, असा सवालदेखील नारायण राणे यांनी विचारला आहे.

‘काय करतात मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून? एक-दोन दिवसांत मुंबईत हॉस्पिटल उभं करू शकत नाही? मुंबईत हवं ते करू शकतो माणूस. फक्त मृतांची संख्या, बाधितांची संख्या जाहीर करायची. हे कमी-ते कमी असं मुख्यमंत्री जाहीर करतात. कमी असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री असतो. नुसतं खुर्चीवर बसून चालत नाही. याला कर्तृत्व लागतं. मुख्यमंत्री मास्क लावा, हे करा, ते करा असं सांगतात का ? दीड हजार देतो हे सांगतायत. एखाद्या क्लर्क किंवा अधिकाऱ्याला सांगा जाहीर करायला. राज्य आर्थिक संकटात टाकायचं काम सुरू आहे’, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *