इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश

नाशिक: नाशिकमधील इगतपुरी येथे रेव्ह पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यांमध्ये ही पार्टी सुरु असताना पोलिसांनी पार्टीमध्ये छापा टाकला.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून या छाप्यात कोकेन आणि इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी काही महिलांनी दाक्षिणात्य आणि बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये एका परदेशी महिलेचाही समावेश आहे.
स्काय ताज व्हीला आणि स्काय लगुन व्हीलाच्या कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या रेव्ह पार्टीत १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश असून यातील ४ महिला चित्रपटांमध्ये काम करत असल्याचे समजते. घटनास्थळी पोलिसांकडून कॅमेरा, ट्राय पॉड आणि मादक द्रव्य जप्त करण्यात आली आहेत.
पार्टीसाठी अंमली पदार्थ कोठून आणण्यात आले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधून पोलिसांनी नायजेरियन नागरिकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.