जांबविहीरच्या बोलक्या भिंती
पाड्यातल्या आदिवासींच्या घरांचं झालं नंदनवन

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील जांबविहीर या गावातल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. या भिंती विद्यार्थ्यांना विविध विषयांचे धडे देतात. 14-15 वर्षांपूर्वी हे गाव शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं होतं. मात्र, गावाचा शैक्षणिक विकास करण्याचे ध्येय बाळगून सुनील नंदनवार या शिक्षकाने इथे कायापालट केल आहे. त्यासाठी त्यांनी स्वखर्चाने गावातल्या प्रत्येक घराच्या भिंतीवर बाराखडी, व्याकरण, सोपी वाक्ये रंगवले आहे. शहाणे करून सोडावे सकळ जन’ हे सुभाषित कृतीत आणले आहे. चौदा वर्षांपूर्वी नागपूरहून नाशिकला स्थायिक झालेल्या सुनील नंदनवार यांची बदली जांबविहीरला झाली. त्यावेळी येथे फारशी चांगली परिस्थिती नव्हती. त्यामुळे गावात मुलांचा मानसिक तसेच शारीरिक विकास व्हायला हवा या उद्देशाने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन शिक्षणपध्दती सोपी करावी व संस्कारही व्हावे यासाठी घरांच्या भिंती रंगवण्याचे काम हाती घेतले. या भिंतींवर सामान्य ज्ञानाबरोबरच अनेक संदेशही त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे गावाचा कायापालट तर झालाच परंतु मुलांबरोबर पालकही अभ्यासाचे धडे गिरवू लागले आहे.
सध्या करोनामुळे नंदनवार हे प्रत्येक घराच्या बाहेर जाऊन तेथे अंगणात विद्यार्थांना शिकवतात. पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थांना सध्या शिक्षण दिले जात आहे. शाळेची विद्यार्थी संख्या पूर्वी ३३ होती ती ५३ झाली आहे. यापुढेही विद्यार्थी संख्या वाढेल असा नंदनवार यांना विश्वास आहे.