Wed. Aug 10th, 2022

नवनीत राणा संसदीय विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार

महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अटकेसंदर्भात आज लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवनीत राणा यांनाही आपली बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता संसद भवन अॅनेक्सी एक्स्टेंशन इथे बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत खासदार नवनीत राणा आपली मुंबईतील अटक आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातील गैरव्यवहाराबाबत बाजू मांडणार आहेत.

नवनीत राणा म्हणाल्या की, लोकसभा अध्यक्ष हे खासदारांचे पालक असतात. आमच्या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींवर कारवाई करावी, असे आवाहन मी त्यांना केले आहे. माझ्या अटकेची संपूर्ण घटना मी त्यांना सांगितली आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समिती 23 मे रोजी माझ्या तक्रारींवर विचार करेल आणि मी समितीला लेखी निवेदनही देईन.

काय आहे प्रकरण ?

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याची धमकी दिल्याने राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर देशद्रोहासह अनेक कलमे लावली होती. त्यानंतर, राणा दाम्पत्याला 5 मे रोजी विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी काही अटींसह जामीन मंजूर केला, ज्यामध्ये या प्रकरणाविषयी सार्वजनिक आणि पत्रकारांमध्ये बोलणे टाळणे समाविष्ट होते. तत्पूर्वी, लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयामार्फत नवनीत राणा यांच्या अटकेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.