Fri. Sep 24th, 2021

भारतात नवरात्रीची धूम…

शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे काय?

कोमल वावरकर, जय महाराष्ट्र, मुंबई : हिंदू संस्कृतीमध्ये दुर्गा घटस्थापनेच फार महत्त्व आहे आश्विन महिन्यात घट स्थापना करतात आणि देवीची पुजा केली जाते. नंदादीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करतात.  नवरात्रोत्सव हा ९ दिवस चालतो. 17 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत आहे. महाराष्ट्रात जसे गणेशोत्सवाची मोठी धूम असते त्याप्रमाणेच गुजरात राज्यात नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोना मुळे सर्वच सणांवर सोशल डिस्टंसींगचे सावट असल्यामुळे नवरात्रीची धूम जरा कमी असलेली पाहायला मिळत आहे. या उत्सवात लहान मुलींची देखील पुजा केली जाते तसेच त्यांना भेट म्हणून साज देतात.


शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे काय?
वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची उपासना करण्याचा असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापना करून आदिशक्तीची नऊ दिवस पूजा अर्चना केली जाते. यालाच नवरात्रोत्सव म्हणतात.

रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते.
नवरात्रोत्सव का साजरा केला जातो?देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. 
भारतात विविध ठिकाणी असा साजरा केला जातो नवरात्रोत्सव…

उत्तर भारतातील नवरात्र उत्सव –उत्तर भारतात नवरात्र उत्सव रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याला रामलीला नाट्याचे यथाविधी सादरीकरण करून ह्या उत्सवाची सांगता होते. ‘विजया दशमी’ च्या दिवशी दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींचा विजय साजरा करण्यासाठी रावण आणि कुंभकर्ण ह्यांच्या प्रतिमांचे दहन केले जाते.
उत्तरेकडील भागात नवरात्रीच्या पर्वावर एकमेकांना भेटी देण्याची प्रथा आहे. त्यात मिठाया, स्त्री पुरुषांसाठी भारतीय वस्त्रे तसेच उपयोगी घरगुती वस्तू इत्यादी भेटीदाखल दिल्या जातात.

पश्चिम भारतातील नवरात्र उत्सव – पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात राज्यात नवरात्र उत्सव गरबा आणि दांडिया रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. गरबा हा नृत्याचा मोहक प्रकार असून त्यात स्त्रिया एका कलशात ठेवलेल्या दिव्याभोवती वर्तुळात फेर धरून आकर्षकरित्या नृत्य करतात. तसेच ‘गरबा’ हे दांडिया नृत्य आहे.ज्यात स्त्रिया आणि पुरुष जोडीने सहभागी होत छोट्या सुशोभित बांबूच्या ‘दांडिया’ हातात घेऊन नृत्य करतात. 

पूर्व भारतातील नवरात्र उत्सव –पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस ‘दुर्गा पूजा’ म्हणून साजरे केले जातात. दुर्गा देवी हाती सारी शस्त्रे घेऊन सिंहावर आरूढ दाखविली जाते. आठवा दिवस हा परंपरेनुसार दुर्गाष्टमीचा असतो. महिषासुराचा वध करताना दर्शविणाऱ्या दुर्गा देवीच्या मुर्त्या उत्कृष्टपणे रेखाटून आणि सजवून मंदिरात आणि इतर ठिकाणी ठेवलेल्या असतात. ह्या मूर्त्यांचे पाच दिवस पूजन केले जाते आणि पाचव्या दिवशी नदीत विसर्जन केले जाते.

दक्षिण भारतातील नवरात्र उत्सव –दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना घरी वेगवेगळ्या बाहुल्या आणि छोटे पुतळे ह्यांचे प्रदर्शन असलेला ‘कोलू’ बघायला आमंत्रित केले जाते. कन्नडमध्ये ह्या प्रदर्शनाला गोंबे हब्बा, तामिळमध्ये बोम्माई कोलू, मल्याळममध्ये बोम्मा गुल्लू तर तेलगूत बोम्माला कोलुवू असे म्हणतात.

कर्नाटक मध्ये नवरात्र म्हणजे दसरा. नवरात्रीच्या नऊही रात्रीला, पुराण कथेतील संदर्भावर आधारीत रात्रभर चालणारे नाट्यमय महाकाव्याचे नृत्य कार्यक्रम, ‘यक्षगान’  सादर केले जाते. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात ‘म्हैसूर दसरा’ साजरा केला जातो. म्हैसूर राजघराण्याकडून आयोजित आणि त्यांची जम्बो सवारी हे मुख्य आकर्षण असलेला हा उत्सव राज्याचा सण मानला जातो. दक्षिण भारतातील बऱ्याच भागात महानवमीच्या दिवशी ‘आयुध पूजा’ मोठ्या डामडौलात साजरी केली जाते. शेतीची अवजारे, सर्व प्रकारची अवजारे, पुस्तके, संगीत वाद्ये, उपकरणे, यंत्रे आणि वाहने या दिवशी सजविली जातात आणि त्यांची पूजा केली जाते, तसेच देवी सरस्वतीचे पूजन केले जाते.दहावा दिवस ‘विजया दशमी’ म्हणून साजरा केला जातो.

केरळमध्ये ह्या दिवशी ‘विद्यारंभम्’ च्या मुहुर्तावर लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली जाते. दक्षिणेकडील शहर म्हैसूर येथे प्रमुख रस्त्यावरुन चामुंडा देवीची भव्य मिरवणूक काढत दसरा साजरा केला जातो.
याशिवाय नवरात्रीत नवचंडी, पुण्याहवाचन, सप्तशतीचे पाठ इत्यादी धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते. अशाप्रकारे आपणही घटस्थापना करून नवरात्रीत देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन करूया आणि तिची यथासांग पूजा करूया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *