‘नवाब मलिक पूर्णपणे निर्दोष’ – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशातच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून मलिकांची पाठराखण करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढल्यामुळे केंद्रीय यंत्रणा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. नवाब मलिकांना आधी ईडीने नोटीस द्यायला हवी होती. असे न करता केंद्राच्या सांगण्यावरून ही कारवाई होत असल्याचा संशय आहे. राजकीय सुडबुद्धीने तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांन केला आहे. दरम्यान, नवाब मलिक पूर्णपणे निर्दोष असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारने ईडी कारवाई करण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले, नवाब मलिक पूर्णपणे निर्दोष आहेत. मलिकांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना त्रास देण्याचा आणि अडकवण्याचा प्रयत्न सुरू असून हे योग्य नसल्याचे वळसे-पाटील म्हणाले आहेत.
नवाब मलिकांची कारवाई ही लोकशाही विरोधातली कारवाई आहे. मलिकांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तसेच या सर्व गोष्टींवर आमचे लक्ष असून त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ असेही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.