नवाब मलिकांनी केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’ ट्विट

क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी अनेक आरोप केले आहे. आज पुन्हा नवाब मलिकांनी एक नवे ट्विट केले आहे. मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्नातील फोटो ट्विट केला आहे.
नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्नातील फोटो ट्विट केला आणि ‘फोटो ऑफ स्वीट कपल’ असे लिहिले. वानखेडेंचा पहिला विवाह कधी आणि कुठे झाला याबाबतही त्यांनी लिहिले आहे. तसेच त्यांनी निकाह नामाजोडून समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख केला आहे. ७ डिसेंबर २००८ रोजी आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
‘मला धर्माच्या नावावर राजकारण करायचे नाही. मी समीर वानखेडे यांच्याविरोधात जे पुरावे सादर केले आहेत ते ज्या फसव्या मार्गाने त्यांनी आयआरएसची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एक पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यातून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे,’ असेही मलिकांनी म्हटले आहे.