एकनाथ खडसे यांना ईडीकडून मुदत

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ८ तासांनंतर खडसे ईडी कार्यालयातून बाहेर आले.
पुण्याजवळील भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड ३१ कोटी रुपयांचा बाजारभाव असताना फक्त ३.७५ कोटी रुपयांत खरेदी करण्याच्या प्रकरणात ‘ईडी’कडून तपास सुरू आहे. यामुळे अनेक कोटी रुपयांच्या सरकारी महसुलाचे नुकसान झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्याच प्रकरणावरुन ईडीने बुधवारी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. त्यानंतर गुरूवारी खडसेंची कसून चौकशी करण्यात आली.
आम्ही ईडीच्या चौकशीला सर्वप्रकारे सहकार्य केलं, ईडीने मागितलेली सर्व कागदपत्र दिली, काही कागदपत्र देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी दिली.
विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी भूखंड खरेदीसाठी पैसे जमवल्याचा संशय ईडीला आहे. मंत्रीपदाचा गैरवापर करून ३१ कोटींचा भूखंड खडसेंनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतला, असा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे.