Wed. Dec 1st, 2021

महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, पालकांनी काळजी घ्या – जितेंद्र आव्हाड

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.

गेल्या अनेक दिवसांपासून सुजय विखे-पाटील यांना अहमदनगरची जागा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होती.

मात्र अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने सुजय विखे-पाटील यांना देण्यास नकार दिल्यामुळे अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

सुजय विखे-पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे.

या प्रवेशानंतर एक ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे.

सर्वांनी विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, जनहितार्थ जारी असे ट्विट आव्हाडांनी पोस्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे-पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

सुजय विखे-पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरच्या विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *