…आणि चक्क राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला हार

राज्यातील कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पहायला मिळतो. दरम्यान सांगलीमध्ये अशाच मनमानी कारभाराचा नगरसेवकाने अनोख्या पद्धतीने निषेध दर्शवला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सांगली महापालिकेत अधिकारी उपलब्ध नसल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चक्क अधिकाऱ्याच्या मोकळ्या खुर्चीला हार घालीत आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी थोरात यांनी कार्यालयातच ठिय्या मांडत नाम जपही केला.

सांगली महापालिकेत अनेक अधिकारी हे वेळेवर आपल्या कार्यालयात येत नाहीत. यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. याचा फटका नगरसेवकांही बसत आहे.

आज सोमवार असल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात हे आपल्या कामासाठी महापालिका मुख्यालयात आले होते. यावेळी ते समाजकल्याण समिती कार्यालयात आपल्या कामासाठी गेले. मात्र अधिकारी उपलब्ध नव्हते यामुळे संतप्त झालेले नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अधिकाऱ्याच्या मोकळ्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.

याचबरोबर अधिकारी येईपर्यंत त्यांच्या कार्यालयात ठिय्या मारत नाम जपही केला. नगरसेवक थोरात यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यालयात एकच पळापळ झाली.

मात्र अधिकारी आल्याशिवाय आपण उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याने अन्य कर्मचाऱ्यांची मात्र पंचायत झाली. या लक्षवेधी आंदोलनाची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.

Exit mobile version