Tue. Jun 28th, 2022

राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण, भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवाडे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या तीन जणांवर गुन्ह दाखल झाला आहे. वैशाली नागवडे यांनी दाखल तक्रारीनंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी पुण्यात महागाईविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलन केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत शहरातील एका पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडत होता. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी यांच्या बालगंधर्वमध्ये कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैशाली नागवडे यांना भाजप नेत्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बसवराज टिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून सभागृहात मारहाण  करण्यात आली. ज्यावेळी आम्ही स्मृती इराणी यांना निवेदन करण्यास गेलो, मात्र त्यावेळी भाजप नेत्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

स्मृती इराणी यांच्या वाहनावर अंडीफेक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी वाढत्या महागाईच्या निमित्ताने राष्ट्रवादीने इराणी यांच्याविरोधात आंदोलन केले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम आटोपून परतत असताना आंदोलकांनी त्यांच्या वाहन ताफ्यावर अंडीफेक केली.

राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने

स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या असताना महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला. स्मृती इराणी हॉटेलवर पोहचण्या आधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. स्मृती इराणी यांनी भेटण्यासाठी आणि त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. मात्र, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं आणि त्यांच्यात झटापट झाली. यानंतर, महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.