मलिकांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालायने कोठडी सुनावली आहे. तसेच मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे.
नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ झालेल्या मविआच्या आंदोलनात अनेक बडे नेते सहभागी होते. या आंदोलनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार, रुपाली चाकणकर, अदिती तटकरे इत्यादी नेते सहभागी झाले.
दरम्यान, लोकशाहीच्या गळचेपीविरोधात मविआचे आंदोलन सुरू असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर, नवाब मलिकांचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले. तसेच मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, असे जयंत पाटील म्हणाले.