Wed. Jun 29th, 2022

‘नवीन वर्षाला नवीन संकल्प’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे राज्यात लागू केलेले निर्बंध पूर्णत: हटवण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुर्हुतावर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त होणार असल्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटवल्यामुळे गुढीपाडव्याच्या मिरवणुका, शोभायात्रा काढता येणार आहेत. तर, रमजानच्या मिरवणुकासुद्धा काढता येणार आहेत.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोना विषाणूचा मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होत आहे. कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या सर्वांनी मुकाबला केला आहे. त्यामुळे नववर्षापासून आपण सर्व नवीन संकल्प करूयात. मात्र, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागिरकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागिरकांनी त्यांच्या सण, उत्सव  तसेच समारंभांनादेखली मर्यादित ठेवले व संयम पाळला. दरम्यान, गुढीपाडव्यापासून राज्यातील निर्बंध हटवण्यात येण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. तसेच, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मास्क वापरण्याचा निर्णय ऐच्छिक’ – राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना निर्बंधांप्रमाणेच नागरिकांनी मास्क वापरण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे. तसेच मास्कचा वापर करण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यसरकारकडून मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली असली तरी मास्क वापरायचा की नाही हा निर्णय ऐच्छिक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ज्या नागरिकांना मास्क वापरायचा आहे त्यांनी मास्कचा वापर करावा. तुमच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.