राज्य सरकारकडून चित्रीकरणाबाबत नवीन नियमावली जाहीर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध कडक केले असून चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबतदेखील नवीन नियमावली जाहीर केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात ऑनलाईन बैठक घेतली.या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, या क्षेत्रातील विविध संघटना, महामंडळ यांचे सदस्य, दिग्दर्शक, कलावंत सहभागी होते. यावेळी चित्रीकरण बंद केले जाणार नाही,अशी ग्वाही दिली. परंतु लोकांना मरतानाही मी पाहू शकणार नाही असा इशारा त्यांनी दिला.चित्रीकरणाच्या वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे आणि यावर विविध संघटनांनी लक्ष ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केली.

याला अनुसरून चित्रीकरणासाठी पुढील नियम करण्यात आले आहेत.

१. चित्रीकरण कमीत कमी लोकांमध्ये करावे. मॉब सीन शक्यतो टाळावेत.

२. चित्रीकरणाची जागा निवडताना शक्यतो दाट लोकवस्तीची ठिकाणे टाळा. इनडोअर ,आऊटडोअर स्टुडिओज, शहराबाहेरील रिसॉर्ट, बंगले वा तत्सम जागा निवडा.

३. योग्य ती कायदेशीर परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे.

४. चित्रीकरण चालू असताना चित्रीकरणाची जागा सोडून इतरत्र भटकू नये.

५. सेट शूटिंग पूर्वी आणि शूटिंग नंतर सँनिटाइज करावे.

६. सेटवर सँनिटायझर, ऑक्सिमीटर, तापमानमापक अत्यावश्यक बाब म्हणून असावेच. प्रत्येकाची नोंद रोजचे रोज ठेवावी.

७. कलावंत सोडून इतरांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. कलावंतांनीही आपले चित्रीकरण झाल्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे.

८. वेळोवेळी ईक्विपमेंट सँनिटाइज करावे.

९. पर्यावरणपूरक असे साहित्य चहा, नाष्टा, जेवण यासाठी वापरावे.

१०. डॉक्टर सेटवर असणे आवश्यक आहे.

११. कन्टन्मेन्ट झोनमधील व्यक्तीला चित्रीकरणासाठी बोलावू नये.

१२. जास्तीत जास्त कामगारांना काम मिळावे म्हणून त्यांना रोटेशन पद्धतीने बोलवावे.

१३. सेटवर पाहणी करण्यासाठी आलेल्या अ.भा.म.चि.म.च्या सदस्याला योग्य सहकार्य करावे.

Exit mobile version