मुंबईत गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर

गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आलेल्या कोरोनारुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता गृहविलगीकरणात राहू इच्छिणाऱ्या रुग्णाच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर दिवशी गृहविलगीकरणातील किमान १० टक्के रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश वैद्यकीय पथकांना देण्यात आले आहेत.

त्रुटी दूर करण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी नव्या सूचनांचा समावेश असलेली सुधारित नियमावली प्रशासनाने जाहीर केली आहे. तसेच प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर आलेल्या गर्भवती महिलांना गृहविलगीकरणाची मुभा देऊ नये, असेही या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची आणि सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे गृहविलगीकरण करून औषधोपचार दिले जातात. गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांसह वैद्यकीय मंडळी आणि रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नियंत्रण कक्ष यांच्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केलेल्या विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारित परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आले आहे.

Exit mobile version