Fri. Aug 12th, 2022

गरीब लोकांना लुबाडण्याचा सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे आणि टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे हताश असलेले लोक ऑनलाईन वेबसाईटवर नोकरी शोधत आहेत. याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात आणि अनेकजण या ऑनलाईन फसवणूकीला बळी पडतात. या कामासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. ‘लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि आठवड्याला २० ते ३० हजार कमवा’,अशा जाहिराती सोशल मीडिया किंवा एखाद्या वेबसाईट,अॅपवर येतात आणि त्याकरिता लोकं अर्ज करतात.

अशाच एका डेटाबेस प्रायव्हेट लिमिटेड असलेल्या कंपनीतून आपल्याला नोकरीकरिता फोन येतो. नोकरीकरिता ते त्यांच्या कंपनीचे युझरनेम पासवर्ड तयार करुन ईमेल पाठवतात. त्या डॉक्यूमेंटवर आपली सही घेऊन एक बनावट अधिकृत करारपत्र देतात ज्यावर आपली सही असते.या प्रक्रियेनंतर एक आठवडाभर त्यांचे ७०० डेटा फॉर्मस त्यांना भरुन द्यायचे आणि सहाव्या दिवशी फॉर्म भरुन झाले की कंपनीकडून फोन येतो.कंपनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला देण्याआधी ४००० रुपये भरण्यास सांगते. जर ते ४००० रुपये आधी भरले नाही तर आपण केलेल्या सहीच्या आधारे कंपनी त्या व्यक्तीला कंपनीचा करार भंग केल्याप्रकरणी मेल करते.यावर या बनावट कंपन्या इथेच न थांबता त्या कंपनीच्या बनावट वकीलाचा ही तुम्हाला फोन येतो. त्यानंतर वकील तुम्हाला कंपनीचा भंग केल्याप्रकरणी तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो.

तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि अचूक करुन न दिल्याने कंपनीचे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई रक्कम म्हणून २५ ते ३० हजार रुपयाची मागणी या कंपन्या करतात. त्यांच्या या कटकारास्थानात तुम्ही नकळत अडकलेले लोक कायदेशीर कारवाईला घाबरुन पैसे ही भरुन टाकतात.पैसे भरुन ही हे इथेच थांबत नाही कंपनीसोबत तुम्ही केलेले करारपत्र तुम्हाला पाठवले जाते. त्यात अनेक अटी शर्ती असतात. तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर ११ महिन्यांचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील,अशी एक अट तुम्ही मान्य केलेली असते. कंपनी तुमच्याकडे ५ ते १० लाखांची मागणी करते. तुम्ही करारपत्र लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करुन हे करारापत्र कंपनीने अस्तित्वात आणलेले असते.

कायदेशीर कारवाईच्या भीतीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा तुम्ही दुर्लक्ष करता. नंतर हे सायबर गुन्हेगार दूरच्या कुठल्यातरी शहरात तुमच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलेली आहे असे तुम्हाला दाखवले जाते आणि या कंपनीचा वकील तुम्हाला सतत तडझोड करून लमसम रुपये भरा, मी प्रकरण मिटवून टाकतो, असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून अर्धी रक्‍कम भरून प्रकरण मिटवून टाकता. चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता. हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सहीचा ते कुठेही कसाही गैरवापर करून ते तुम्हाला लुबाडू शकतात. कारण, सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही.

तुम्हाला महिना ५० हजार देण्यापेक्षा १० ते १५ हजारात ते एखादा टायपिस्ट कामाला ठेवू शकत नाहीत का? त्यामुळे घरबसल्या सहज पैसे मिळवण्याच्या मोहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात फसू नका. अशी काही फसवणूक झाल्यास सरळ सायबर सेलकडे तक्रार करा, असे आवाहन सायबर सेलकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी : मयुरी ओंबासे,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.