न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय; ट्रेंट बोल्ट चमकला  

पहिले 3 सामने गमावल्यानंतर यजमान न्यूझीलंडने चौथ्या वन डे सामन्यात भारताला 8 विकेट राखून पराभूत केले आहे.

भारताने विजयासाठी दिलेले 93 धावांचे आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सामन्यात 2 बळी घेतले.

या विजयासह न्यूझीलंडने भारताचे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे.

विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघांचा आजच्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला आहे.

त्याआधी, चौथ्या सामन्यात भारतीय संघाला खऱ्या अर्थाने कडवी टक्कर मिळाली आहे. हॅमिल्टनच्या मैदानात ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव कोसळला.

एका क्षणापर्यंत धावफलकावर 50 धावा लागायच्या आधी भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यामुळे भारत वन-डे क्रिकेटमध्ये आपला नवा निच्चांक नोंदवतो की काय असे चित्र निर्माण झाले होते.

मात्र हार्दिक पांड्याने भारतावर आलेली ही नामुष्की टाळली. मात्र तो ही फारकाळ खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. अखेर भारताने 92 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले.

चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी माघारी परतली.

आपल्या कारकिर्दीचा 200 वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या 7 धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही.

यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले.

न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 10 षटकात 21 धावांमध्ये 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 10 षटकात 26 धावांमध्ये 3 बळी घेतले.

 

 

Exit mobile version