Tue. Jun 15th, 2021

मी जगलेलो “वारी”

खांद्यावर भगवी पताका, कपाळी गोपी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, हाती टाळविळा, मुखी विठूनामाचा गजर,ग्यानबा तुकारामचाजयघोष,

माउली माउली म्हणत ओथंबलेले स्वर, प्रस्थान, रिंगण, हरिपाठ, अश्व, समाजआरती, भारुड, अभंग, दोस्तहो चार दिवस झालेत पंढरीचा

निरोप घेऊन. आता सोन्याच्या जेजुरीत म्हणजेच घरी आलोय मात्र अजूनही शांत चित्ताने डोळे लावले की कानात टाळ मृदंग वाजतयं अन समोर उभे

राहतात ते विठूनामाचा गजर  करणारे वारीच्या वाटेवरचे वारकरी. समतेची पताका खांद्यावर घेऊन  एकात्मतेची दिंडी , मानवतेचा

धर्म शिकवणारी “वारी” आजपासून परतीच्या प्रवासाला लागली आहे. वारीच्या या सगळ्या सोहळ्यात अवघाची संसार सुखाचा झाला.

 

जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचा प्रतिनिधी म्हणून यंदाही वारी कव्हर करताना वारी अनुभवन्यासोबतच “वारी” जगता सुद्धा आली.  इरावती

कर्वेंनीमहाराष्ट्राची व्याख्या करताना म्हटलंय,”पंढरीला येणाऱ्या लोकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र “. खरंच याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. पंढरीच्या या

वारीत अवघा महाराष्ट्र बघायला मिळतो.

 

 १  मे १६६० पासून रूढ झालेली महाराष्ट्राची “ओळख” जागृत असली तरी , महाराष्ट्राची “आत्मखूण” मात्र शेकडो वर्षांची आहे, “जावे पंढरीसी,आवडी

मनासी” म्हणत ती आत्मखुण “वारकरी” जपतोय. भक्ती, श्रद्धा, आस्था आणि निश्चय या मानवी भावनांचा सामुहिक आविष्कार म्हणजे वारी. माणसाचे

माणसाशी रक्तापलीकडचे नेमके काय नाते आहे ते वारीतच समजू शकते. वारकरी आणि विठ्ठल यांचे नाते निखळ प्रेमाचे. संतांच्याबरोबर श्री विठ्ठलाच्या

नामचिंतनात त्या विठ्ठलाकडे केवळ प्रेमचं मागण्यासाठी निघालेल्या प्रेमळ भक्तांचा मेळा म्हणजे वारी.

 

मराठी माणसांची प्रमुख ओळख काय असेल तर ती एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे “पंढरीची वारी”. तसं पाहिलं तर

माझ्या “बा” अगोदरही मी कोणत्या“बा”ला मानत असेल तर ते म्हणजे “ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबाला” . त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत

तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे कव्हर करणे हे माझ्यासाठी काम नव्हतेच ,ती तर माझ्यासाठी “आनंदयात्राच” होती .

 

आमचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी यंदा वारी कवर करण्याची संधी दिली .सोबतच “तुला जे योग्य वाटेल तसं कर” म्हणत अधिकार सुद्धा दिले. वारीत

एका गोष्टीचं मला नेहमीच नवल वाटतं. कितीही लहान अथवा मोठा , शिकलेला अथवा अडाणी कोणीही असो , आपण ज्यांना भेटतो ज्याचं दर्शन घेतो तो

साक्षात माणसाच्या रुपात माऊलीच. म्हणूनच समोर व्यक्ती कोणीही असो, इथं परस्परांच्या पाया पडलं जातं. वारीच्या वाटेवरचा सर्वात जास्त अंतराचा

टप्पा म्हणजे पुणे ते सासवड आणि त्यातही दिवे घाटाची नागमोडी वळणाची अवघड चढण.

तस पहिलं तर या घाटातून माझं नेहमीचच येण जाणं. या घाटातून जाताना गाडीचे इंजिन सुद्धा “थकते”.  पण वारकरी थकत नाहीत.  उलट घाट सर

केल्यावर त्यांच्या आनंदाला आणखीनच उधाण येतं. विठूनामाचा गजर करत  चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगात विलक्षण बळ संचारतं आणि त्यांची पावलं

पंढरीकडे धावू लागतात. वारकऱ्यांच्या या शक्तीचं  मला नेहमीच आश्चर्य वाटत आलंय. पण खरं सांगू वारी चालताना पावलंही भक्त झालेली असतात.

 

यंदा मी स्वतःच दिवे घाटाच्या पायथ्यापासून दिवे घाट चालायला सुरूवात केली. आणि पाहता पाहता काही वेळात मी दिवे घाट चढून वर आलो. तेही न

थकता . घाट सर केल्यावर माझ्या मुखासोबत शरीराच्या आतही जणू विठूनामाचाच गजर घुमत असल्याची जाणीव मला झाली. आस्तिक नास्तिक

यापलीकडे जाऊन वास्तववादी विचार मी तरी आजवर आयुष्यात  नेहमीच केलाय. वारी मला “वास्तववादी” वाटली. जेजुरीत सोहळा आला तेव्हा जरा मी

“हवेतच” होतो.

 

अहो गाव आहे माझ जेजुरी. पंढरीला बुक्का अन आमच्याकडे भंडारा. पिवळ सोन. अहो आमचा भंडारा उधळून पालखीचं जेजुरीमध्ये थाटात स्वागत होत.

आमचे संपादक भोईटे सरांनी ठरवलं की “स्टुडीयोतला विठ्ठल” बाहेर काढूयात आणि त्यांनी मला आमच्या “विठ्ठल विठ्ठल” या स्पेशल शोच्या अन्करींगची

संधी सुद्धा वारीतुनच दिली.

 

वारकऱ्यांचे शीण घालवणारा सोहळा म्हणजे “रिंगण”. टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताकांची दाटी, अश्वाकडे रोखलेल्या नजरा ,अश्वांची भरधाव

दौड,ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम” असं उत्साहवर्धक आणि स्फूर्तीदायी वातावर  अश्वांच्या दौडीनंतर माती कपाळी लावण्यासाठी अक्षरशः झुंबड

उडते. हे सगळं काही नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. हे सगळं अनुभवता आलं. रिंगणा नंतर होणारा उड्यांचा खेळ , पावली , फुगडी हे सार

पाहताना  आम्हीही त्यात दंग होतो. आम्ही सुद्धा फुगडी , पावली खेळत वारी जगलो. म्हातारी बाई तरूणींना लाजवेल अशी फुगडी घालते. म्हातारा टाळ

वाजवत उड्या मारतो,नाचतो. या सर्वांना जर विचारलं ,की या वयात हे कसं शक्य होतं? तर सगळ्यांचं उत्तर एकच आहे की,आमचं सगळं आयुष्य आम्ही

विठ्ठलाला वाहिलेलं आहे आणि तोच हे करवून घेतो.

 

अहो! एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी‍ सहलीला येणार्‍यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं

तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते ,आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्‍याच्या भोवती दिडींचा

आराखडा. रांगा किती,महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. ‘गोपालकाल्यात’ सर्वांच्या शिदोर्‍या एक करतात आणि नंतर वाटून

घेतात, नकळत एकमेकांची प्रांपंचिक दु:खेही वाटून घेतात. वारीच्या वाटचालीतील मुक्काम, विसावा, रिंगण, मालिकेप्रमाणे भजन, कीर्तन,भारुडे या

साऱ्यांचा उत्तम क्रम लावून वारीला खरोखरीच लष्करी शिस्तीचे रूप दिले.

वारीची शिस्त पाहिल्यावर लक्षात येते, की वारी म्हणजे लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे. पंढरीच्या वारीत सारे वारकरी मोठ्या प्रेमाने एकत्र

येतात, पायवारी करताना एकमेकांना आपले अनुभव सांगतात, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवतात. आपल्या लाडक्या

विठूरायाच्या , पंढरीरायाच्या म्हणजेच विठ्ठल भक्तीच्या प्रसाराच्या नवीन कल्पना सांगतात. वारीत नव्याने आलेल्या नवख्यांना जुने , जाणकार, अनुभवी

वारकरी मार्गदर्शन करतात.

 

नीतिमान भक्तीचा वसा ल्यालेल्या समाजमनस्क साधकांचा मेळा म्हणजे वारी. हा मेळा ज्याला भेटण्यासाठी वाटचाल करतो तो विठ्ठलही त्याच्या

भक्तांसारखाच – प्रेमळ, कर्मरत आणि लौकिक जीवनाचा आदर करणारा! विठ्ठलाकडे काही मागण्यासाठी ही वारी नाही. वारकरी मुक्तच असावा,हाच

भागवतधर्माचा संकेत. मुक्ती प्रपंचापासून नाही तर अहंकार आणि उपाधीपासून! त्या मुक्तीचे दान जगाला करण्यासाठी भक्तिपंथाने निघालेल्या विठ्ठल

भक्तांचा मेळा म्हणजे वारी.

 

ज्यांना “नक्षलवादी” म्हणन्यापर्यत काहींनी मजल मारली  ते सचिन -शीतल माळी मला वारीत भेटले , मला हमीद, मुक्ता दाभोलकर भेटले , मला शाहीर

संभाजी भगत भेटले. वारीत अंधश्रद्धा असती तर ही माणसे मला भेटली नसती. याचाच अर्थ वारीत श्रद्धाच जोपासली जातीये. मातीशी असणारी बांधिलकी

दाखवल्याने पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा सन्मान स्वीकारून आमचे संपादक तुळशीदास भोईटेसर सुद्धा वारीत आले आणि एक दिवस वारकर्यांसोबत चालले.

खरतरं ते सुद्धा त्या दिवशी वारकरी झाले. अन कधी नव्हे संपादकांना सुद्धा प्रश्न विचारून  त्यांच्या नजरेतून सुद्धा वारी समजून घेता आली. मुळात वारी हे

एक चालतं बोलतं गाव आहे. अनेकांच्या पोटाला आधार देण्याचं काम सुद्धा वारी करते. वारीत बहुसंख्येने सामील होतो तो म्हणजे “शेतकरी”. वारी अगोदर

शेतकरी संपाने महाराष्ट्र ढवळून निघाला. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या राहून गेल्या. त्यामुळे वारीला सुरूवातीला वारकऱ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी

जाणवले. मात्र निम्म्याटप्यानंतर वारकर्यांची संख्या दुपटीने वाढली.

वारीचा सोहळा हा सर्वांना समान सूत्रात बांधणारा, धर्मभेद मिटवणारा धार्मिक सोहळा म्हणावा लागेल .गेल्या अनेक वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या

पालखी सोहळ्याचा पहिला विसावा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात होतो. पुण्यात सहकारनगर येथे काही मुस्लीम युवक मोफत वारकर्यांची मसाज करून

देताना मी पाहिले .दौंड तालुक्यातील  यवत येथे पालखी सोहळ्यातील वारकर्यांना पिठले भाकरीचा प्रसाद देण्याची परंपरा अनेक वर्षापासून जोपासली जाते.

त्या दिवशी यवत मधील सगळ्या मुस्लीम बांधवांनी पिठलं भाकरी खावून उपवास सोडला. मशिदी समोर तीनशेच्यावर भाकरी तयार करण्यात

आल्या. मशिदीतल्या भाकरी मंदिरात गेल्या.जेव्हा पालखी सोहळा निमगाव केतकीत आला तो दिवस म्हणजे ईद. निमगावला मुस्लीम समजाने प्रेमाने

वारकर्यांना “शिरखुर्मा” दिला. खरंच धर्माच्या पलीकडे जाऊन जोपासलेली ही बंधुता वारीत पाहता आली. अनुभवता आली. सर्वधर्मसमभाव इथेच

दिसतो. मी तर म्हणतो धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी वारीत येऊन बघायलाच हवे. की कट्टरता, द्वेष, घृणा, दुसऱ्याच्या धर्माबद्दलचा

तिरस्कार ,राग इथं नाही. इथं आहे सहिष्णुता, आदर, आपुलकी आणि धर्माची खरी शिकवण.

 

अतीव श्रद्धा आणि त्या श्रद्धेला काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे आषाढीची पायवारी. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण

देणा-या मोठमोठ्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊनही व्यवस्थापनाचे जे पाठ शिकता येणार नाहीत त्यांचे मूर्तिमंत दर्शन घडते ते पालखी सोहळ्याच्या

नियोजनात आणि व्यवस्थापनात. श्री क्षेत्र आळंदीपासून निघून श्रीक्षेत्र पंढरीस पोहोचेपर्यंत पालखी सोहळ्यात लाखोंचा समुदाय सहभागी होतो.

त्यामुळे, एक शहरच जणू फिरते आहे, असे वाटते. फिरत्या नगरव्यवस्थापनाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. एवढ्या प्रचंड संख्येने येणाऱ्या आणि

चालणाऱ्यांचे नियंत्रण, शिस्तबद्ध चलनवलन,राहणे-खाणे-निजणे या सगळ्यांची सोय, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, मलमूत्र विसर्जन व कचरा

व्यवस्थापन, वाहतुकीचे नियंत्रण आणि पालखीच्या मुक्कामाचे संयोजन यांसारख्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीमध्ये व्यवस्थापनशास्त्राची अक्षरश:

अगणित सूत्रे दडलेली आहेत. व्यवस्थापनशास्त्राच्या अध्यापक-अभ्यासक विद्यार्थ्यांनी आवर्जून शिकावे असे वारीच्या व्यवस्थापनाचे हे ‘मॉडेल’ आहे.

 

 

अगणित दिंड्यांचा समावेश असणारा भव्य पालखी सोहळा आणि त्या सोहळ्याचे आज अनेक शतके होत आलेले स्वयंस्फूर्त, काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन

आणि व्यवस्थापन हा खरोखरच एक व्यापक अभ्यासाचा विषय आहे. शासनव्यवस्था, संस्थान समिती, सोहळ्याचे मालक, सर्व

मानकरी, दिंडी समाज यांच्या समविचारातून साकारणारे वारीचे संयोजन आणि व्यवस्थापन म्हणजे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या तत्त्वाचे सम्यक्

दर्शनच होय.

 

वारीत सहभागी होऊन, प्रसंगी गर्दीत घुसून, गाडीच्या टपावर, ट्रक, टँकर, झाडावर चढून “शूट घेणे” तसे अवघड काम होते. एक आव्हान होते.

इथे ‘रिटेक’ही भानगड नव्हती मात्र आमचा विडीओ जर्नलीस्ट अमोल धर्माधिकारीने जोखीम पत्करून का होईना सगळ काही कॅमेऱ्यात कैद करत होता,

आमचा सारथी रुपेश शिवकरने सुद्धा दोनही पालखी सोहळे कव्हर करताना वेगावर आणि वेळेवरसुद्धा  नियंत्रण ठेवत सगळ काही जुळवून आणलं.

रिंगणातील धावणारे अश्व, वारक ऱ्यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे खेळ, माऊलींच्या पादुकांचे नीरास्नान, समाजआरती, सोपानकाका-ज्ञानेश्वर भेटीचा

क्षण, अश्वाकडून ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेतानाचा क्षण, १०-११ वर्षांचा पखवाज वाजवणारा मुलगा, १०५ वर्षांच्या वृद्ध आईला गेली ५-६ वर्षे

खांद्यावर घेऊन वारी करणारा विठ्ठल मुंडे नावाचा आधुनिक श्रावणबाळ,पालखी रस्त्यावरून जात असताना अश्व रस्त्यावर दिसताच शेतात काम करणारा

एखादा शेतकरी,महिला शेतकरी हातातील काम टाकून त्याचे दर्शन घेण्यासाठी ज्या ओढीने पळत येतात व अश्वाला हात लावून दर्शन घेताच त्यांच्या

चेहऱ्यावरचा आनंद हे असे कितीतरी एकदाच ‘क्लिक’ होणारे क्षण वारीत आम्ही जगलो. माझ. प्रामाणिक मत आहे कि वारी बहुजनवद्यांची नाही , ती

पुरोगाम्यांची नाही , ती सनातन्यांची नाही , ती हिंदुत्ववाद्यांची नाही. वारी कोणत्याही गटाची तटाची नाही तर वारी ही फक्त वारकऱ्यांचीच

आहे. मात्र वारीत सुद्धा आता राजकारण शिरताना दिसू लागलंय आणि ते पुण्यात , पंढरपुरात सर्वांनी अनुभवले सुद्धा त्यामुळे या बाबींचा अवश्य विचार

झालाच पाहिजे.

वारीच्या वाटेवर अचानक ओ तुम्ही निलेश जगताप ना? आमच्या गावात शिवाजी महाराजांवर व्याख्यान द्यायेला आलात ना? असे म्हनणारे सुद्धा अनेक

वारकरी भेटले. तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का? म्हणनारे तरुण वारकरी भेटले. ओ टी.व्ही. वाले आमच्या दिंडीत जेवायला येता का ? असे म्हणणारे

वारकरी भेटले. खरच हे प्रेम फक्त वारीच देऊ शकते.”माउली” नावाची जादू काय आहे माहिती आहे का?  वारीत कितीही जोरात हॉर्न वाजवा वारकरी

बाजूला सरकत नाहीत. रुग्णवाहिकेचा आवाज आला तर स्वताःहून वाट मोकळी करून देतील, पण तुमच्या वाहनाचा हॉर्न कितीही जोरात  वाजवा सरकत

नाहीत.पण त्यावेळी फक्त हात जोडून माउली माउली म्हणा. क्षणात वाट मोकळी. ही  खरी जादू आहे “माउली” नामाची.एका आजोबांना मी

विचारलं,,”माऊली तुम्ही इतक्या वर्षापासून वारी करताय.काय मागता पंढरीनाथाकडे?.हसतमुखाने ,प्रेमळ स्वरात आजोबा म्हणाले,पंढरीनाथाकडे हेच

मागणं आहे की पंढरीनाथा मरेपर्यंत पंढरीची वारी चुकू देऊ नको. कारण माझं जगणं म्हणजे वारी आहे. तुम्हाला सांगतो,मी तिथंच विठ्ठल पाहिला. अशा

किती म्हणून आठवणी सांगू, कोणकोणते प्रसंग सांगू. ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे.

आषाढी एकादशीला पहाटेच्या वेळी झालेले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन.भाग्यवान समजतो मी स्वतःला.खरंच वारीत मी जगायला शिकलो.जे कोणत्याही

विद्यापिठात शिकायला मिळणार नाही ना. ते या वारीच्या लोकविद्यापिठात मला शिकायला,जगायला मिळाले. व्यक्तीमत्वाचा विकास

घडवणारे,जगण्याचा मुलमंत्र देणारे हे विद्यापीठ आहे. गेल्यावर्षी आषाढीच्या काळातच “कोपर्डी”प्रकरण समोर आले. पांडूरंगाकडे एकच मागणं आहे त्या

कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर होऊदे. पाऊस पडूदे. बळीराजाचे कल्याण होऊदे. आजपासून पालखी सोहळे परतीच्या दिशेने

प्रस्थान ठेवताहेत. परतीचा प्रवास सुद्धा कव्हर  करायचाच आहे.  एकदा. वारी कव्हर करणे आणि वारी करणे यात खूप फरक आहे. दोनदा वारी कव्हर

केली , मात्र एकदा तरी “वारी करायचीये”.तसंही वारी वारीत येऊन जगल्याशिवाय कळूच शकत नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारी नक्की

करा. एक तरी वारी अनुभवाव. मी नेहमी बोलत असतो. व्याख्यानांच्या माध्यमातून सुद्धा बोलतोय. आणि कॅमेऱ्यासमोर सुद्धा बोलतोच. मात्र कधी नव्हे ते

लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. त्यामुळे जरा समजून घ्या. खरंच वारी हा चैतन्याचा  सोहळा आहे. ती एक सामाजिक प्रेरणा आहे.शेवट गदीमा म्हणतात

त्यानुसार. “ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे” ईश्वराच्या अंशाबद्दल तर माहिती नाही. पण

ज्ञानियाचा वा तुक्याचा वंश मात्र आपण आहोत. आणि राहू. पुढच्या वर्षी वारीत भेटूच.

 

ब्लॉग – निलेश जगताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *