Mon. Dec 6th, 2021

नाशिकमध्ये रोडरोमिओंवर ‘निर्भया’ पथकाची धडाकेबाज कारवाई!

नाशिकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निर्भया या विशेष पथकाची स्थापना केली होती. याच पथकांकडून टवाळखोर आणि रोडरोमियांचा समाचार घेतला जात आहेत. भर रस्त्यावर टवाळखोरांना अद्दल घडविली जात असल्याने महाविद्यालयीन आणि वर्दळीच्या ठिकाणी या पथकांची दहशत निर्माण झालीय. ‘निर्भया पथक’ आलं असं कुणी म्हटलं, तरी टवाळखोर आणि रोडरोमिओ धूम ठोकतात. काही दिवसांपूर्वी स्थापना करण्यात आलेल्या या पथकाने आतापर्यंत 235 हून अधिक टवाळखोरांवर कारवाई केली आहे.

काय आहे निर्भया पथक?

महिला सुरक्षा हा नेहमीच कळीचा मुद्दा असतो, त्याच अनुषंगाने नाशिक पोलिसांनी निर्भया पथकाची यंत्रणा सुरू केली.

एकूण 10 पथकं यासाठी कार्यान्वित करण्यात आली.

तरुण महिला पोलिसांचा यामध्ये मुख्य सहभाग आहे.

त्यांना मदत म्हणून तरुण पुरुष पोलीस काम करतात.

सकाळी पाच पथकं काम करतात, तर रात्रपाळीला पाच पथकं काम करतात.

पोलीस आयुक्तालयातून साध्या वेशभूषा करत दोन महिला दोन पुरुष आणि एक वाहन चालक असं एकूण पाच पोलिसांचं निर्भया पथक रवाना होतं.

कशी आहे निर्भया पथकाची कार्यपद्धती!

ठरलेल्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने पाळत ठेवतात.

याच पथकातील महिला टवाळखोरांच्या आसपास फिरतात आणि छेड काढण्याचा प्रयत्न किंवा कॉमेंट केली तर आक्रमक होत त्यांना ताब्यात घेतले जाते.

यावेळी मात्र या पाचही व्यक्तिकडे छुपे कॅमेरे लावलेले असतात.

आणि त्यात ही संपूर्ण घटना कैद होते.

एका पथकाकडून दिवसाला जवळपास 20 टवाळखोरांचा समाचार घेत कारवाई केली जाते.

असा एकूण दिवसभरात दीडशेहून अधिक जणांवर निर्भयापथक कारवाई करत आहेत.

नाशिक शहरात एकूण 500 हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.

दर दोन तासाला टप्प्याटप्प्यानुसार कामं केली जातात.

100 नंबर आणि 1091 हा टोल फ्री क्रमांक यासाठी कार्यान्वित करण्यात आलाय.

महिलांना आणि तरुणींना संकटसमयी कुठेही न डगमगता आम्हाला संपर्क करा, असं निर्भया पाथकाकडून आवाहन करण्यात आलंय.

तसंच काहीवेळा या पथकातील महिला पोलिसांनाच टवाळखोर मुलांनी छेडल्याचा घटना घडल्यास छेडछाड करणाऱ्या या मुलांवर कडक कारवाई करत त्यांना समज दिली जाते

नाशिक शहरात अनेकदा टवाळखोर आणि रोडरोमियांचा त्रास सर्वसामान्य आणि महिलांना सहन करावा लागतो, मात्र काही दिवसांपासून नाशिक शहरात निर्भया पथक कार्यान्वित झाल्याने अनेकांच्या मनात धडकी भरलीय. महाविद्यालयीन परिसरात तर अक्षरशः निर्भया पथक आलेय असे समजताच धूम ठोकतात त्यामुळे महिला आणि तरुणींकडून या पथकाच्या कारवाईचे स्वागत केल जातय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *