Thu. May 6th, 2021

आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सरकारला इशारा

राज्यावर ओढवलेलं कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. राज्यात ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. असं असलं तरी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने सकाळी १० ते ५ या वेळेत दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच विषयावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

राज्यात लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘राज्यात एक किंवा दोन आठवड्यांची टाळेबंदी लागू होऊ शकते. यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून सोमवारपासून सकाळी १० ते सायंकळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवली जातील’, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्टीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

या निर्णयाला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून सर्व दुकानं खुली करण्यात येणार असून सर्व व्यापारी बांधवाबरोबर आम्ही आहोत! महाराष्ट्र सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता राज्यातील जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केलेला आहे. तर आदेशाविरोधात भूमिका घेत शुक्रवारपासून सर्व दुकानं उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर सोमवारपर्यंत दुकानं उघडण्याचं व्यापाऱ्यांनी टाळलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *