Wed. Apr 14th, 2021

कोरोनाची लक्षणे नसलेल्यांची प्रतिजन चाचणी नाही

रुग्णालयात आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोणत्याही नागरिकांची प्रतिजन चाचणी पालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांनी करू नये, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. तसेच लक्षणे असलेल्या एखाद्या संशयिताची प्रतिजन चाचणी करता येईल. मात्र त्याचा अहवाल आयसीएमआरच्या संकेतस्थळावर नोंदवणे बंधनकारक असेल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

पालिकेला न कळवताच अनेक खासगी रुग्णालये परस्पर प्रतिजन चाचण्या करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर चहल यांनी चाचण्यांबाबत नुकतीच नवीन नियमावली जाहीर के ली. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एखाद्या रुग्णाची प्रतिजन चाचणी के ल्यास त्याचा अहवाल काहीही असला तरी तो आयसीएमआरच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. तसेच बाधित रुग्णांची यादी पालिकेला कळवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना लक्षणे असलेला रुग्ण खासगी रुग्णालयात आला असता रुग्णालयांना त्याची प्रतिजन चाचणी करता येईल. रुग्णालयाकडे खाटा उपलब्ध असतील तर नियंत्रण कक्षाला कळवून त्याला दाखल करता येईल, असेही या नवीन नियमावलीत म्हटले आहे.

नागरिकांच्या चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले असून प्रयोगशाळांनी हे अहवाल २४ तासांतच आयसीएमआरच्या संकेतस्थळावर नोंदवावेत, असे आदेश पालिकेने दिले आहेत. तसेच पालिकेला न कळवता नागरिकांना परस्पर अहवाल कळवू नये. नागरिकांना परस्पर अहवाल दिल्यामुळे रुग्णशय्या व्यवस्थापन बिघडत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रयोगशाळांकडे दुपारी दोन वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचे अहवाल त्याच दिवशी देण्यात यावेत. त्यानंतर आलेल्या नमुन्यांचे अहवाल दुसऱ्या दिवशी २४ तासांत द्यावेत. नागरिकांचे नमुने घरी जाऊन गोळा करायचे असल्यास लक्षणे असलेल्या संशयितांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रयोगशाळांचा परवाना रद्द करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *