Sun. Oct 17th, 2021

तुर्कस्तानचा बेचव कांदा, व्यापारी आणि ग्राहकांचा वांदा

देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी तुर्कस्तान आणि इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखलं खरं. मात्र या कांद्याला खरेदीदार मात्र अजिबातच मिळत नसल्याने ‘तुर्कस्तानच्या कांद्याने केला, व्यापाऱ्यांचा वांदा’ अशी स्थिती चाकण मार्केटमध्ये दिसत आहे.

गेल्या काही दिवसात कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने तसंच कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून एक लाख मेट्रीक टनपेक्षा अधिक कांदा तुर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखलं.

परदेशातून आयात केलेला कांदा बाजारात दाखल झालाय.

तुर्कस्तान पाठोपाठ इजिप्तचा कांदा ही चाकण बाजारात दाखल झालाय.

परंतु या कांद्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवली आहे.

चवीला अत्यंत सुमार दर्जाचा असलेला तुर्कस्तानचा कांदा सामान्य नागरिक खरेदी करण्यास तयार नाहीत.

गावरान कांद्याच्या तुलनेत या तुर्कस्तानच्या कांद्याला अजिबातच चव नसल्याचं ग्राहक आणि खुद्द कांदा व्यापारी सांगत आहेत.

हॉटेल व्यावसायिक मात्र स्वस्तात कांदा मिळतोय म्हणून तुर्की कांदाला पसंती देत आहेत.

शासनाच्या धोरणात्मक व्यापारामुळे व्यापाऱ्यांनी 30 रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा 10 ते 15 रुपये किलो दराने चाकण मध्ये विकण्याची वेळ आली आहे. तरीही त्याला ग्राहक नसल्याची स्थिती समोर येत आहे.

चाकण मार्केट मध्ये गावरान कांद्याची आवक घसरली आहे. गावरान कांद्याला प्रतवारीनुसार प्रती किलोस 40 ते 50 रुपये असा भाव चाकण मार्केट मध्ये मिळत आहे. कांद्याने जसं गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणलं तसं पाणी परदेशी तुर्की, इजिप्शियन कांद्याने व्यापारी, आडत्यांच्या डोळ्यांत आणलंय. त्यामुळे शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *