शाळेला टाळं, गावकरीच जि.प.च्या आवारात घेतायत मुलांची शाळा!

अनेक वेळा मागणी करून देखील शाळेला शिक्षकच नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे शाळेला टाळं ठोकण्यात आलंय. येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी चक्क शाळेला टाळं ठोकून सर्व विद्यार्थ्यांना जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आणून त्यांची शाळा भरवली. ग्रामस्थ या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद आवारातच शिकवत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे डोळे उघडावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. तब्बल 100 हून अधिक विद्यार्थ्यांना गावकरी स्वतःच शिक्षक बनवून या जिल्हा परिषदेच्या आवारात CEO कार्यालय परिसरात शिकवताना बघायला मिळत आहे

जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये शिक्षक हजर नसल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि पालकांनी या शाळेला कुलूप ठोकलं आहे.

शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद येथे आले आहेत.

यापूर्वी शाळेला दोन शिक्षक होते. त्यांची पदोन्नती झाली आणि ते निघून गेले.

मात्र नवीन नियुक्त झालेले शिक्षक अनेक दिवस उलटले तरी अद्याप रुजू झालेले नाहीत.

सहा शिक्षकांची आवश्यकता असताना शाळेला एकही शिक्षक नाही.

वारंवार मागणी करूनही शाळेत शिक्षक नाही.

विद्यार्थी  आणि त्यांचं शिक्षण वाऱ्यावरती असल्याचं बघायला मिळत आहे.

या प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि गावकऱ्यांनी आज शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या आवारात आणलं.

जिल्हा परिषदेमध्ये या विद्यार्थ्यांची शाळा भरवलेली आहे. शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना गावकरी या ठिकाणी शिक्षक बनून शिकवत आहेत. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जोपर्यंत येऊन भेट घेत नाही, तोपर्यंत हे  आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Exit mobile version