Fri. Mar 22nd, 2019

भाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत

0Shares

आपल्या दमदार कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता भाऊ कदमचा ‘नशिबवान’ चित्रपट गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र इतर मराठी चित्रपटाप्रमाणे ‘नशिबवान’ च्या वाट्यालाही उपेक्षाच आली आहे. मराठी प्रेक्षकवर्ग जास्त असलेल्या एकाही चित्रपटगृहात ‘नशिबवान’ ला स्क्रीन मिळत नसल्याची खंत भाऊ कदमने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.

‘एखादा परभाषीय चित्रपट ‘हिट’ होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावे लागते. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून हे दाखवलं जातं की तुमचा ‘मराठी’ चित्रपट चालतच नाही. मध्यमवर्गीयांसाठी बनवलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. मग बोंब उठवली जाते की, तुमचा मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत. ‘नशीबवान’ च्या निमित्ताने मला आणि माझ्या निर्मात्यांना ह्याचीच प्रचिती आली.’ असे भाऊ कदमने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच ‘ज्या डोंबिवली चा उल्लेख मी ‘हवा येऊ द्या’ च्या प्रत्येक भागात करतो, ज्या डोंबिवलीचा मी म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा ‘नशीबवान’ ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही. संपुर्ण चित्रपट मुलुंडमध्ये चित्रित झाला आहे. तिथेही एकाही चित्रपटगृहात ‘नशीबवान’ ला स्थान मिळाले नाही. कित्येक लोक चित्रपटगृहात जाऊन परत फिरले आणि ऑनलाइन बुकींग करून गेलेल्यांना शो कॅन्सल झाल्याचे कारण देऊन ‘हिट’ झालेल्या हिंदी चित्रपटाची तिकिटं त्यांच्यावर लादली गेली.’ असं लिहित मराठी चित्रपटाची महाराष्ट्रात होणारी परवड भाऊ कदमने मांडली आहे.

एका दाक्षिणात्य चित्रपटानं आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही मराठी चित्रपटांना एक-एक चित्रपटगृह मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय’ असं लिहित भाऊने सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

‘ज्या हिंदी चित्रपटसृष्टीला खत पाणी घालून आपल्या महाराष्ट्राने जोपासलं, मोठं केलं ती आपल्या मराठी सिनेमाची अशीच पायमल्ली करत राहणार का?’ असा सवालही भाऊनं आपल्या फेसबुक पोस्टमधून विचारला आहे.

मराठी चित्रपटाला शो न मिळण्याची ही पहिलीच वेळ नसून पुलंवरील ‘भाई’ चित्रपटालादेखील सर्वात कमी शो मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *