Thu. May 6th, 2021

“पुढचे PM राहुल गांधी नव्हे, तर मायावती!”

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि भाजपविरोधात महागठबंधन होत आहे. मात्र महागठबंधनातील PM कोण होणार, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील, असं काँग्रेसकडून दर्शवण्यात येतंय. मात्र राहुल गांधी नव्हे, तर मायावतीच पुढच्या पंतप्रधान असतील, असा दावा करण्यात आलाय. हा दावा बसपाच्या कोणत्याही नेत्याने केला नसून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी केलाय.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधींपेक्षा मायावतींचं नाव पुढे असल्याचं नटवर सिंह यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसला मात्र येत्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. काँग्रेस जास्तीत जास्त 88 ते 90 जागा मिळवू शकतं असा त्यांनी अंदाज व्यक्त केलाय.

हे ही वाचा- “महागठबंधन म्हणजे थट्टाच, मोदी सरकारचा पर्याय नव्हे!”

काँग्रेसमधील एकजूट सोनिया गांधींमुळे

नटवर सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना राजस्थानमधील परिस्थितीवरही भाष्य केलं.

अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील आंतर्गत मतभेदांमुळे राजस्थानात काँग्रेस सरकार फार काळ टिकणार नाही, असा त्यांनी दावा केलाय.

काँग्रेसमध्ये दिसून येणारी एकजूट ही केवळ सोनिया गांधी यांच्यामुळे टिकून आहे, असंही नटवर सिंह यावेळी म्हणाले. सोनिया यांच्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये बंड होऊन फूट पडेल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं.

हे ही वाचा-  ‘देश संकट में है’ म्हणत विरोधकांची एकजूट!

मोदींची प्रतिमा ढासळली आहे

पंतप्रधान मोदींवर टीका करताना नटवर सिंह यांनी मोदींकडे व्यापक दृष्टीकोन नसल्याचं म्हटलं.

मोदी अजूनही दक्षिण भारतापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असं सिंह म्हणाले.

तीन राज्यांतल्या पराभवानंतर मोदींची प्रतिमा ढासळली आहे.

पक्षाचं नेतृत्व करणं आणि देशाचं नेतृत्व करणं यात फरक असल्याचंही यावेळी नटवर सिंहांनी म्हटलं.

काँग्रेसकडे भारतासाठीचा दृष्टीकोन आहे, असा विश्वास त्यांनी दर्शवला.

नटवर सिंहांचा मुलगा बसपामध्ये!

एकीकडे महागठबंधन जिंकून येणार असा विश्वास सिंह यांनी दर्शवलाय.

यामध्ये  उत्तर प्रदेशाची भूमिका महत्त्वाची  ठरणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे.

मात्र मायावती यांना जास्त जागा मिळतील आणि त्याच PM होतील, असं सिंह यांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह हा बसपतर्फे निवडणूक लढवणार आहे.

अलवर येथील रामगढ विधानसभा मतदारसंघातून जगत सिंह हे बसपाच्या तिकिटावर उभे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *