राणा दाम्पत्याच्या घराला नोटीस

राणा दाम्पत्याच्या घराला मुंबई मनपाने नोटीस पाठवली आहे. मुंबई मनपाची राणा दाम्पत्याच्या घरावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
राणा दाम्पत्याला मनपाने नोटीस पाठवली आहे तर दुसरीकडेराणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. शनिवारी, ३० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती मात्र आजही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तसेच जामिन अर्जावरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे राणा दाम्पत्याला १४ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
शनिवारी राणांचे वकील रिझवान मर्चंट आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला. दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ६ गुन्हे दाखल आहेत.
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या अट्टाहासापोटी राणा दाम्पत्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याना स्वतंत्र कोठडी देण्यात आली असून रवी राणा तळोजा कारागृहात आणि नवनीत राणा भायखळा महिला कारागृहात कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच राणांना घरचे जेवण मिळणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
राणा दाम्पत्याने २३ एप्रिलला मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आजही राण दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामिनावर सुनावणी पार पडणार आहे.