Fri. Aug 6th, 2021

पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वाराला भारतीय शीख आता करु शकतात व्हिसाशिवाय प्रवेश!

कर्तारपूर इथल्या दरबारसिंग गुरुद्वाराला भारतीय शीख बांधव आता व्हिसाशिवाय प्रवेश करु शकतात. यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झालीये. कर्तारपुर कॉरीडॉरचा अंतिम मसूदा मात्र अजूनही तयार करण्यावर मात्र सहमती होऊ शकली नाहीये.

पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे.

गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या या गुरुद्वाऱ्यामध्ये शीख भाविकांना प्रवेश देण्याविषयी अनेक वर्षांपासून चर्चा होत होती.

पाकिस्तानने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दिल्यानंतर दोन्ही बाजूंकडून त्यावर चर्चा सुरू झाली.

अमृतसर जिल्ह्यातील अट्टारी येथे बुधवारी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली.

त्या वेळी भाविकांना प्रवेश देण्यासाठी शुल्क लावण्याचा पाकिस्तानचा आग्रह होता, तर भारताने त्याला आक्षेप घेतला.

तसंच गुरूद्वाराच्या आवारामध्ये भारतीय राजनैतिक किंवा राजशिष्टाचार अधिकारी असावा, असे भारताचे म्हणणे आहे, तर पाकिस्तानचा त्याला विरोध आहे.

पाकिस्तानने त्यांच्या या भूमिकेचा फेरविचार करावा, असे आवाहन भारतीय अधिकाऱ्यांनी केले.

भारतीय भाविकांना या गुरूद्वाऱ्यापर्यंत व्हिसा न घेताही प्रवेश देण्याला दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली.

त्यामध्ये अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे.

दररोज 5000 भाविक या गुरूद्वाऱ्याला भेट देऊ शकतील; तसेच विशेष दिवसांमध्ये ही संख्या वाढू शकते. पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या सुविधांवर ही संख्या निश्चित होणार आहे.

आठवड्यातील सातही दिवस हा कॉरिडॉर सुरू राहणार असून, गटाने किंवा वैयक्तिकरीत्या या गुरूद्वारेला भेट देण्याची मुभा भाविकांना असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *