Wed. Jan 19th, 2022

महाराष्ट्रातल्या वाघांच्या संख्येत सुमारे 65% वाढ

राज्यात वाघांच्या संख्येत चांगली वाढ झाल्याचं व्याघ्रगणनेतून पुढे आलंय. 2014 साली 190 वाघ होते. ते वाढून आता 2019 मध्ये 312 झाले आहेत. ही वाढ अंदाजे 65% आहे. देशातील एकूण वाघांची संख्या 2967 इतकी झाली आहे.

भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते.

2006 साली देशात वाघांची संख्या 1411 होती.

2010 साली संख्या 1706 होती

2014 साली ही संख्या 2226 होती.

2019 आता ही संख्या 2967 झाली आहे.

 

महाराष्ट्रातील वाघांची स्थिती

2006 साली वाघांची संख्या 103 होती.

2010 मध्ये वाघाची संख्या 168 झाली.

2014 मध्ये वाघांची संख्या 190 झाली.

2019 मध्ये मात्र ही संख्या 312 इतकी झाली आहे.

वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या 308 वरुन 526 इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या 406 वरुन 524 इतकी झाली आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.

व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या 340 वरुन 442 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या 190 वरुन 312 इतकी झाली आहे.

पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या 229 वरुन 264 झाली आहे.

महाराष्ट्रात 6 व्याघ्रप्रकल्प

महाराष्ट्रात सहा व्याघ्रप्रकल्प राबवले जात आहेत. बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिलंय.

व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याउद्देशानेठी डॉ. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना’ राबविली जात आहे.

योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात.

यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतांना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.

स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचं हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *