Thu. Jan 20th, 2022

पंतप्रधानांच्या हस्ते पंढरपूर पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाचे ऑनलाईन भूमीपूजन

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंढरपूर पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम कृष्ण हरी म्हणत भूमिपूजनाच्या भाषणाला त्यांनी मराठीमध्ये सुरूवात केली. ‘सर्व वारकऱ्यांना माझा नमस्कार. पंढरपूरची सेवा करणे माझ्यासाठी श्री नारायणाची सेवा करणे आहे. विठ्ठलाने आज मला तुमची भेट करून दिली आहे. पंढरपूरमधील पालखी मार्गाचे भूमिपूजन करताना मला आनंद होत असल्याचे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

  ‘पंढरपूरमधील वारकऱ्यांच्या दिंडीत भेदभाव नसतो. मी काशीचा आहे, आणि पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी. त्यामुळे माझे पंढरपूरसोबत खास नाते आहे. वारकऱ्यांकडून मला आर्शिवाद हवे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी संत ज्ञानेश्वर, आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड करण्याचे सांगितले. म्हणजेच जोवर महामार्ग तयार होईल तोवर ही झाडे मोठी झालेली असतील. तसचे पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात पंढरपूर भारतातील सर्वात स्वच्छ तिर्थस्थळ म्हणून पाहायचे असल्याचे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

  पंढरपूरमधील संत ज्ञानेश्वर महाराज महाराज पालखी मार्ग हा २२१ किमीचा असणार आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा १३० किमीचा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंढरपूरमधील या पालखी मार्गांचे चौपदरीकरणाचे ऑनलाईन भूमीपूजन झाले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी प्रत्यक्षस्थळी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *